पुणे : मद्यधुंद पोलिसांचा राडा हॉटेल व्यवस्थापक, कर्मचार्‍यांना मारहाण; गुन्हा दाखल | पुढारी

पुणे : मद्यधुंद पोलिसांचा राडा हॉटेल व्यवस्थापक, कर्मचार्‍यांना मारहाण; गुन्हा दाखल

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मुंढव्यातील एका हॉटेलमध्ये दारूच्या नशेत पुणे शहर पोलिस दलातील तीन पोलिसांनी राडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली. दारू पिल्यानंतरही आणखी दारूची मागणी करून हॉटेलमधील व्यवस्थापक व कर्मचार्‍यांना तिघांनी मारहाण केली.  याप्रकरणी मुंढवा पोलिस ठाण्यात मारहाण तसेच मुंबई दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उमेश मरिस्वामी मठपती (29, रा. सोमवार पेठ), अमित सुरेश जाधव (37, रा. भवानी पेठ) आणि योगेश भगवान गायकवाड (32, रा. केशवनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

हॉटेल व्यवस्थापक कुणाल दशरथ मद्रे (27, रा. घोरपडी गाव) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस मठपती फरासखाना पोलिस ठाण्यात, जाधव समर्थ वाहतूक विभाग आणि गायकवाड चंदननगर पोलिस ठाण्यात काम करतात. तर, फिर्यादी मद्रे हे त्या हॉटेलमध्ये मॅनेजर आहेत. सोमवारी (दि. 21) रात्री सव्वा वाजता मद्रे हॉटेल बंद करून आवराआवर करीत होते. त्या वेळी पोलिस उमेश मठपती, अमित जाधव आणि योगेश गायकवाड हॉटेलमध्ये गेले. त्यांनी बार काउंटरवर दारू प्याली. नंतर आणखी दारूची मागणी केली. शिवीगाळ करीत रोहित काटकर याला मारहाण केली. मोठमोठ्या आवाजात धमकी देऊन हॉटेलमधील बार काउंटरवर धिंगाणा घालून ते दारूची मागणी करीत होते.

अनेकदा हॉटेल व्यवस्थापकाने त्यांना तेथून जाण्यास सांगितले. मात्र, तरी देखील तिघे ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यानंतर तुम्ही आमचे काहीच वाकडे करू शकत नाही. आम्ही पोलिस आहोत. तुम्हाला दाखवतो, असे बोलून शिवीगाळ करीत धमकी दिली.
घटनेची माहिती मिळताच मुंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित लकडे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) प्रदीप काकडे यांच्यासह अधिकारी, पोलिस घटनास्थळी गेले. तिघांवर मुंढवा पोलिस ठाण्यात मारहाण आणि मुंबई दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्या तिन्ही पोलिस कर्मचार्‍यांना खात्यातून निलंबित करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश अप्पर पोलिस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर यांनी दिले आहे.

Back to top button