

बारामती : पुढारी वृत्तसेवा : बारामती शहर पोलिसांनी मंगळवारी (दि. 22) बेशिस्त रिक्षाचालकांना चांगलाच दणका दिला. वाहतूक परमिट नसणार्या व पार्किंगचे नियम न पाळणार्या 14 रिक्षांवर पोलिसांनी कारवाई करीत त्या थेट पोलिस ठाण्याच्या आवारात आणून लावल्या. पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांनी यासंबंधीची माहिती दिली. बारामती शहरामध्ये दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत चालली आहे. रस्ते प्रशस्त होत असताना पार्किंगची मोठी समस्या शहरात आहे. त्यात प्रवासी वाहतूक करणार्या रिक्षा या रस्त्यावर बेशिस्तपणे पार्किंग करीत असतात.
थांब्यावर व्यवस्थित रांगेत रिक्षा न लावता प्रवासी पळविण्यासाठी दोन रांगा करून रिक्षा लावल्या जातात. त्याचा फटका वाहतुकीला बसतो. त्यातून अनेकदा वाहतूक कोंडी होते. अस्ताव्यस्त पार्किंग करून अन्य वाहनांना अडथळा निर्माण केला जातो. शहरात कोणताही रिक्षाचालक त्याला नेमून दिलेला गणवेश व बिल्ला लावत नाही. गणवेश नसल्याने नेमका तो रिक्षावालाच आहे का? हे कळत नाही. त्यातून काही अनुचित प्रकार इतर शहरांत घडले आहेत. या प्रकाराला आळा बसावा, यासाठी बारामतीत मंगळवारी पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली. 14 रिक्षांवर कारवाई करीत त्या पोलिस ठाण्याच्या आवारात आणून लावण्यात आल्या. ही कारवाई अप्पर पोलिस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुनील महाडिक, उपनिरीक्षक बाळासाहेब जाधव व वाहतूक शाखेच्या कर्मचार्यांनी केली.