राजगुरूनगर बँकेच्या अध्यक्षपदी ॲड. राहुल तांबे पाटील, उपाध्यक्षपदी दत्तात्रय भेगडे बिनविरोध | पुढारी

राजगुरूनगर बँकेच्या अध्यक्षपदी ॲड. राहुल तांबे पाटील, उपाध्यक्षपदी दत्तात्रय भेगडे बिनविरोध

राजगुरूनगर, पुढारी वृत्तसेवा: सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी ॲड. राहुल पोपटराव तांबे पाटील आणि उपाध्यक्षपदी उद्योजक दत्तात्रय रामचंद्र भेगडे यांची बिनविरोध निवड झाली. दोन्ही पदाधिकारी भीमाशंकर सहकार पॅनेलचे असुन पॅनेलप्रमुख किरण आहेर, किरणशेठ मांजरे व सहकाऱ्यांनी पहिल्या निवडीत राजगुरूनगर व चाकणला प्रतिनिधित्व दिल्याचे मानले जाते.

नुकत्याच झालेल्या बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत अत्यंत चुरशीने लढत झाली. त्यात भीमाशंकर सहकार पॅनेलला १७ पैकी १२ जागांवर घवघवीत यश मिळाले. मंगळवार २२ नोव्हेंबर रोजी बँकेच्या सभागृहात नवनिर्वाचित संचालक मंडळाची बैठक झाली. त्यात दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एक अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी हर्षित कांबळे यांनी बिनविरोध निवडीची घोषणा केली. यानंतर राहुल तांबे पाटील व दत्तात्रय भेगडे समर्थकांनी जल्लोष केला.

मावळते अध्यक्ष राजेंद्र वाळुंज, उपाध्यक्ष अरुण थिगळे, संचालक किरण आहेर, किरणशेठ मांजरे, विजयाताई शिंदे, विजय डोळस, राजेंद्र सांडभोर, दिनेश ओसवाल, समीर आहेर, सागर पाटोळे, अविनाश कहाणे, गणेश थिगळे, विनायक घुमटकर, अश्विनीताई पाचारणे, रामदास धनवटे, मुख्य कार्यकारी अधिकारी शांताराम वाकचौरे व अधिकारी यावेळी उपस्थित होते. अभिनंदन करण्यासाठी चाकण येथील माजी अध्यक्ष अशोक भुजबळ, राजेंद्र गोरे, बिपिन रासकर, संतोष वाव्हळ, संदेश गीते, किसन पिंजन, गणेश बोत्सुधीर वाघ, राजगुरूनगर येथील ॲड. गणेश सांडभोर, गौतम कोतवाल, पप्पूशेठ टोपे आदी उपस्थित होते. उपाध्यक्ष अरुण थिगळे यांनी सर्वांचे आभार मानले.

बँकेच्या प्रगतीचा आलेख चढता आहे. पुणे जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात १७ शाखांमधून बँकेचे कामकाज सुरू आहे. तो आलेख कायम ठेवताना वसुलीसाठी निवडणुकीचा वाया गेलेला कालावधी व जवळ आलेला मार्च अखेर विचारात घेऊन व सभासद हित जोपासना करून कर्ज वसुलीसाठी प्रयत्न केले जातील.

– ॲड. राहुल तांबे पाटील, नवनिर्वाचित अध्यक्ष

बँकेच्या कामकाजात सर्वसमावेशक सहभाग आणि योग्य व धोरणात्मक निर्णय घ्यायला प्राधान्य दिले जाईल.

– दत्तात्रय भेगडे, नवनिर्वाचित उपाध्यक्ष

 

 

Back to top button