पुणे: खून करून पळून गेलेल्या प्रियकरास पोलिसांनी ठोकल्या बेड्या

file photo
file photo

महाळुंगे इंगळे, पुढारी वृत्तसेवा: महाळुंगे पोलीस चौकीच्या हद्दीतील खराबवाडी ( ता. खेड ) येथे उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील महिलेचा प्रेम प्रकरणातून प्रियकराने चाकुने गळा कापुन व दगडाने ठेचुन खून करणाऱ्या आरोपीस पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट-३ च्या पोलीस पथकाने कोणताही सुगावा नसताना अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करून २४ तासाच्या आत गजाआड केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा खून रविवार २० नोव्हेंबर रोजी दुपारी झाला असून निकीता संभाजी कांबळे ( वय २८, सध्या रा. खराबवाडी, ता. खेड, जि. पुणे, मुळ रा. कवठा, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद ) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी राम कुंडलिक सुर्यवंशी ( वय ३९ वर्षे, रा. पवारवस्ती, साईबाबा मंदिर, दापोडी, पुणे ) यास पोलिसांनी पुण्यातील सिम्बायोसिस परिसरातून अटक केली आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस उप आयुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त गुन्हे व गुन्हे शाखा युनिट ३ यांचेकडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना वेगवेगळया टिम तयार करुन गुन्हा उघडकीस आणण्यासाठी मार्गदर्शन सुचना दिलेल्या होत्या.

पोलीस पथकाने या परीसरातील ९० सीसीटीव्ही तपासले. महिलेची ओळख पटविण्याकरीता या परीसरातील घरमालक, घरभाडेकरु, कंपनीतील कामगार, सुपरवाझर, स्थानिक नागरीकांकडे चौकशी करीत असताना पोलीस नाईक ऋषिकेश भोसुरे व जवान राजकुमार हनमंते यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून माहीती मिळाली की, ही मयत महिला ही खराबवाडी येथील हनुमान मंदिरामागील पाण्याच्या टाकीजवळील दिलीप गुलाब खराबी यांच्या १५ नंबरच्या खोलीत राहण्यास असून ती शनिवार रात्रीपासून बेपत्ता आहे.

वरीष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड गुन्हे शाखा युनिट ३ यांना माहिती देऊन त्यांच्या आदेशाप्रमाणे या पोलीस पथकाने या महिलेच्या नातेवाईकांना संपर्क केला असता या महिलेचे नाव निकीता संभाजी कांबळे ( वय २८ वर्षे, सध्या रा. खराबवाडी, ता. खेड, जि. पुणे, मुळ रा. कवठा, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद ) असे असल्याबाबत समजले. या महिलेचा मोबाईल नंबर प्राप्त करत त्याचा तांत्रिक विश्लेषात्मक तपास सुरु केला. मयत महिलेच्या कॉल रेकॉर्ड्सवरून संशयीत राम कुंडलिक सुर्यवंशी ( वय ३९ , रा. पवारवस्ती, साईबाबा मंदिर, दापोडी, पुणे ) यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक तपास केला असता प्रथमतः त्याने उडवा उडवीची उत्तरे देऊन ही महिला माझी जवळीची मैत्रिण असून तिला कोणी मारले? असा कांगावा करत दुःख झाल्याचे भासवुन तपास पथकाची पुर्णपणे दिशाभुल करण्याचा प्रयत्न केला. परंतु युनिट ३ कडील तपास पथकाने संशयीत आरोपीकडे कौशल्यपुर्ण तपास केल्याने संशयीत आरोपीने गुन्हा केल्याची कबुली दिली.

त्याने दिलेल्या माहीतीनुसार, मयत महिला निकीता कांबळे हीचे व आरोपीचे पुर्वी एकत्र काम करताना प्रेम झाले होते. त्यानंतर काही दिवसांनी निकीता कांबळेचे आणखी कोणाशी तरी प्रेमसंबंध असल्याबाबत आरोपी राम सुर्यवंशी यास संशय आला. तसेच राम सुर्यवंशी याचे लग्न झाले असल्यामुळे त्याच्या घरातील लोकांना या प्रेमसंबधाबाबत माहीती झाली होती. त्यामुळे सुर्यवंशी याची पत्नी त्याच्या सोबत बोलत नव्हती. तसेच निकीता कांबळे देखील त्याचाशी न बोलता दुर्लक्ष करीत होती. त्यामुळे रागाच्या भरात निकीताचा खुन केल्याची धक्कादायक कबुली दिली.

ही कारवाई ही पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. प्रशांत अमृतकर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक गिरीश चामले, पोलीस अंमलदार- यदु आढारी, सचिन मोरे, ऋषीकेश भोसुरे, सागर जैनक, अंकुश लांडे, राजकुमार हनमंते, योगेश्वर कोळेकर, त्रिनयन बाळसराफ, राहुल सुर्यवंशी, सुधिर दांगट, महेश भालचिम, विठठल सानप, समीर काळे, निखील फापाळे, शशिकांत नांगरे, रामदास मेरगळ, तांत्रिक विश्लेषक नागेश माळी, राजेंद्र शेटे यांनी केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news