आळंदी : अलंकापुरीत रंगला माउलींचा रथोत्सव; माउलींच्या नामघोषात वारकरी दंग | पुढारी

आळंदी : अलंकापुरीत रंगला माउलींचा रथोत्सव; माउलींच्या नामघोषात वारकरी दंग

आळंदी : पुढारी वृत्तसेवा

कृपाळु उदार माझा ज्ञानेश्वर,
तया नमस्कार वारंवार ?
न पाही याती कुळाचा विचार,
भक्त करूणाकर ज्ञानाबाई?
भलतीया भावे शरण जाता भेटी,
पाडीतसें तुटी जन्मव्याधी ?
ज्ञानाबाई माझि अनाथाची माय,
एका जनार्दनी पाय वंदितसे ?

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त सोमवारी (दि. 21) माउलींच्या पालखीची रथातून ग्रामप्रदक्षिणा काढण्यात आली. या रथोत्सवाने अवघी अलंकापुरी भक्तीरसात नाहली होती. रथात विराजमान माउलींच्या मुखवट्याचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी रथाच्या दोन्ही बाजूस गर्दी केली होती. माउलींच्या पालखी टाळ-मृदंगाच्या गजरात साडेचार वाजेच्या दरम्यान मुख्य महाद्वारातून ग्रामप्रदक्षिणेसाठी बाहेर पडली. पावणेपाच वाजता पालखी गोपाळपुरा येथील श्रीकृष्ण मंदिरात दाखल झाली.

मंदिरात विसावल्यानंतर सव्वापाच वाजता पालखीतील माउलींच्या चांदीच्या मुखवट्याला चांदीच्या रथावर विराजमान करण्यात आले. तद्नंतर आरती होऊन पालखी टाळ- मृदंगाच्या गजरात साडेपाच वाजता मार्गस्थ झाली. मानाच्या दिंड्यांमधील वारकरी पालखी पुढे चालत होते. गोपाळपुरा रस्त्यावरून पालखी वडगाव चौकात आली असता दिंडीतील वारकर्‍यांनी फेर धरत टाळ-मृदंगाचा गजर केला. रथासमोर रांगोळीच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या.

माउलींचा रथ सायंकाळी उशिरा मंदिरात परतला. पहाटे दोन वाजता पवमान अभिषेक, दुधारती या नित्यपूजा विधीबरोबरच पहाटे तीन वाजता कार्तिकी द्वादशीची महापूजा प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण यांच्या वतीने झाली. सकाळपासून पावसाचे आगमन झाल्याने शहरात गर्दी पांगल्याचे चित्र होते तर अनेक भाविकांनी परतीचा मार्ग धरल्याचे दिसून आले.

 

 

 

Back to top button