रस्त्यावर राडारोडा; विश्रांतीनगर चौक ते जनता वसाहतमधील नागरिक त्रस्त | पुढारी

रस्त्यावर राडारोडा; विश्रांतीनगर चौक ते जनता वसाहतमधील नागरिक त्रस्त

पुणे; पुढारी वृत्तसेवा : सिंहगड रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी कालव्याच्या (कॅनॉल) बाजूला रस्ता तयार करण्यात आला आहे. त्यावर वाहतूक सुरू करण्यात आली असली, तरी या रस्त्यावर राडारोडा टाकला जात आहे, त्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. धायरी, खडकवासला, हिंगणे, नर्‍हे या भागातील नागरिक सिंहगड रस्त्यावरून ये- जा करतात. त्यामुळे सिंहगड रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी होते. ही कोंडी फोडण्यासाठी राजाराम पूल ते फनटाइन थिएटरपर्यंत उड्डाणपूल उभारले जात असून, त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे पुन्हा वाहतूक कोंडी होत आहे.

सिंहगड रस्त्याला पर्याय ठरणार्‍या फनटाइम थिएटर ते जनता वसाहत (गणेश मळा) या दरम्यानच्या नवीन मुठा कालव्यालगतच्या रखडलेल्या रस्त्याचे काम पूर्ण झाले असून, त्यावर वाहतूक सुरू आहे. विश्रांतीनगर चौक ते जनता वसाहत यादरम्यान 1.2 किलोमीटर लांबीचा 7.5 मीटर रुंदीचा रस्ता सिमेंट काँक्रिटचे काम पूर्ण झाले. सध्या या रस्त्यावरून वाहतूक सुरू आहे. मात्र, महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात कचरा, बांधकाम आणि रस्त्याचा राडारोडा टाकला जात आहे, त्यामुळे हा रस्ता जीवघेणा ठरण्याची शक्यता आहे.

पथदिवेही बंद
राजाराम पूल ते फनटाइन थिएटरपर्यंत उड्डाणपूल उभारण्याचे काम सुरू होण्यापूर्वी विश्रांतीनगर चौक ते जनता वसाहत रस्त्याचे काम पूर्ण करणे अपेक्षित होते. सध्या रस्ता पूर्ण झाला असला तरी, या रस्त्यावर कुठे अंधार तर कुठे प्रकाश अशी स्थिती आहे. विश्रांतीनगर चौकातून जनता वसाहतीकडे येताना अनेक पथदिवे बंद आहेत, त्यामुळे रस्त्यावर संपूर्णपणे अंधार असतो.

 

Back to top button