पुणे : जिनोम सिक्वेन्सिंगनेे लाट रोखता आली असती | पुढारी

पुणे : जिनोम सिक्वेन्सिंगनेे लाट रोखता आली असती

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कोरोना विषाणूच्या डेल्टा व्हेरियंटच्या लाटेत जिनोम सिक्वेन्सिंगवर भर दिला असता तर दुसरी लाट अधिक चांगल्या प्रकारे नियंत्रित करता आली असती, असा निष्कर्ष इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्चच्या अभ्यासातून काढण्यात आला आहे. संस्थेने डिसेंबर 2020 ते मार्च 2022 दरम्यान शहरातील कोरोनाबाधित रुग्णांच्या 10,000 हून अधिक नमुन्यांचा अभ्यास केला.

डेल्टा व्हेरियंट पहिल्यांदा डिसेंबर 2020 मध्ये नोंदवला गेला आणि एप्रिल 2021 मध्ये शहरात रुग्णसंख्येने उच्चांक गाठला. यामध्ये पाच महिन्यांचा कालावधी होता. लाटेच्या पहिल्याच टप्प्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या नमुन्यांचे जिनोम सिक्वेन्सिंग केले असते तर आजार नियंत्रणाच्या दृष्टीने वेगाने पावले टाकता आली असती, असे अभ्यासकांचे मत आहे.

कोरोना साथीच्या सुरुवातीला व्हेरियंटचा अभ्यास करण्यापेक्षा संसर्ग नियंत्रित करण्यावर भर देण्यात आला. मअ टेल ऑफ टू व्हेव्हजफ या शोधनिबंधामध्ये याबाबत भाष्य करण्यात आले आहे. आयसरमधील जीवशास्त्राचे सहाय्यक प्राध्यापक कृष्णपाल करमोडिया म्हणाले, मआम्ही शहरातील कोरोनाच्या दुस-या आणि तिस-या लाटांची तुलना केली आहे.

एप्रिल 2021 मध्ये डेल्टा व्हेरियंटच्या संसर्गाचा उच्चांक झाल्याने प्रथम त्याबाबत अहवाल तयार करण्यात आला. डेल्टाच्या तुलनेत ओमिक्रॉन किती वेगाने पसरत आहे, याची तुलना करण्यात आली. डेल्टाचा उच्चांक गाठण्यासाठी पाच महिने लागले, तर ओमिक्रॉनने अवघ्या काही आठवड्यांत उच्चांक गाठला. ओमिक्रॉनच्या लाटेमध्ये संसर्गाचा वेग आणि रुग्णांची संख्याही खूप जास्त होती. मात्र, रुग्णालयात भरती होण्याचे प्रमाण कमी होते.

जिनोम सिक्वेन्सिंगच्या सहाय्याने विषाणूमधील उत्परिवर्तन समजते आणि त्यानंतर रुग्णांमधील लक्षणांशी त्याचा संबंध जोडता येतो. साथीच्या रोगासाठी तत्काळ आणि कठोर उपायांची आवश्यकता असताना त्यावेळी उपलब्ध असलेल्या डेटाचे विश्लेषण केले जाऊ शकते. जिनोम सिक्वेन्सिंगच्या माहितीचा वापर पुन्हा साथीचा रोग असल्यास तो हाताळण्यासाठी केला जाऊ शकतो.
                                                                 डॉ. राजेश कार्यकर्ते,
                                                                  उपअधिष्ठाता, ससून

Back to top button