पुणे विद्यापीठ अधिसभेचा आज लागणार निकाल; खाशाबा जाधव संकुलात मोजणी | पुढारी

पुणे विद्यापीठ अधिसभेचा आज लागणार निकाल; खाशाबा जाधव संकुलात मोजणी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीसाठी आज (दि. 22) सकाळी 8 वाजल्यापासून विद्यापीठातील खाशाबा जाधव क्रीडासंकुल येथे मतमोजणी होणार आहे. यासाठी सर्व तयारी विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत मतदारांची संख्या दुप्पट असल्याने यंदा निकालाला अधिक वेळ लागण्याची शक्यता आहे. अधिसभेच्या दहा जागा पदवीधरांमधून निवडून देण्यासाठी रविवारी मतदान झाले होते.

विद्यापीठाचे कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रफुल्ल पवार म्हणाले की, सर्व मतमोजणी ही सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या देखरेखीत होणार आहे. यासाठी साधारण 17 हजार चौरस फूट अशा भव्य क्रीडासंकुलात 72 काउंटर तयार करण्यात आले आहेत. विद्यापीठातील 300 प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी या प्रक्रियेत सहभागी होणार आहेत. मतमोजणीचे आकडे ठरावीक वेळेनंतर मोठ्या पडद्यावर जाहीर करण्यात येतील. मागील वेळी निकाल जाहीर होण्यासाठी पहाटेचे सहा वाजले होते. त्यामुळे यंदा महिला आणि ज्येष्ठ कर्मचारी यांचा विचार करून व जास्तीत जास्त युवा कर्मचारी व अधिकारी यात सहभागी केले आहेत.

मतमोजणी प्रक्रियेबाबत आम्ही सराव केला. वेळेचा अंदाज घेऊन निकाल वेळेत लावण्यासाठी सूक्ष्म नियोजन केले आहे. मागील वेळच्या तुलनेत दुप्पट मतदान झाल्यामुळे अधिक वेळ लागू शकतो. मात्र, त्याच दिवशी निकाल जाहीर करण्यासाठी आमचा प्रयत्न राहील.
                 डॉ. प्रफुल्ल पवार, कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी

गेले अनेक महिने विद्यापीठातील अनेक अधिकारी व कर्मचारी या निवडणूक प्रक्रियेत काम करीत आहेत. आतापर्यंत अत्यंत नियोजनबध्द पद्धतीने ही प्रक्रिया पार पडली आहे. मतमोजणी देखील योग्य पद्धतीने पार पडेल, असा माझा विश्वास आहे.

                                                                     – डॉ. संजीव सोनावणे, प्र-कुलगुरू

Back to top button