राजुरी शिवारात बंद सदनिका फोडली | पुढारी

राजुरी शिवारात बंद सदनिका फोडली

बेल्हे; पुढारी वृत्तसेवा : अज्ञात चोरट्यांनी राजुरी शिवारातील बंद सदनिका फोडून मोठा ऐवज लंपास केल्याची घटना सोमवारी (दि. 21) सकाळी उघडकीस आली. याबाबत आळेफाटा पोलिस व ग्रामस्थांकडून समजलेली माहिती अशी की, राजुरी (ता. जुन्नर)शिवारात लवणमळ्यातील अनिल श्रीपत औटी हे शनिवारी गावाला गेले होते. त्यामुळे त्यांचे घर दोन दिवसापासून बंद होते.

सोमवारी सकाळी शेजारच्या ग्रामस्थाला त्यांच्या बंगल्यामागील कंपाउंडचे दार उघडे आणि खिडक्याचे ग्रील काढलेले दिसले. त्या खिडकीतून आत डोकावले असता त्यांना घरातील वस्तू अस्तव्यस्त दिसल्याने घरात चोरी झाली असल्याचा संशय आला. त्यांनी ही माहिती आळेफाटा पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घरात प्रवेश करून पाहणी केली.

चोरट्यांनी मोठा ऐवज लंपास केल्याचे बोलले जात आहे. दरम्यान अनिल श्रीपत औटी हे बाहेरगावी असल्याने त्यांच्या लवणमळा येथील बंद बंगल्यातून चोरट्यांनी किती रुपयांचा ऐवज लंपास केला याबाबतचा अधिकृत तपशील मिळू शकला नाही. सोमवारी सायंकाळपर्यंत आळेफाटा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली नसल्याने चोरट्यांनी नेमका किती ऐवज लंपास केला याविषयी अधिकृतपणे माहिती मिळू शकली नाही.

Back to top button