पिंपळे गुरव : शिक्षकांविना विद्यार्थी वाऱ्यावर !.. | पुढारी

पिंपळे गुरव : शिक्षकांविना विद्यार्थी वाऱ्यावर !..

पिंपळे गुरव : पुढारी वृत्तसेवा :  सांगवीतील मध्यवर्ती भागात असलेल्या अहिल्याबाई होळकर पालिका शाळेतील चौथी आणि सहावी या इयत्तांसाठी गेल्या सहा महिन्यांपासून शिक्षक नसल्याने जवळपास 73 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची भिती पालकांनी व्यक्त केली आहे. अहिल्याबाई होळकर शाळेत बालवाडी ते सातवीपर्यंत घरची हलाखीची परिस्थिती असलेल्या कामगारांची मुले शिक्षणं घेत आहेत. यात पालिका शाळेतील चौथीतील अडोतीस आणि सहावी इयत्तेतील पस्तीस विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सद्यस्थितीत शिकत आहेत. या दोन्ही इयत्तेत शिक्षक भरती झाली नसल्याने या जागा बर्‍याच काळ रिक्त आहेत. त्यामुळे सध्या इतर इयत्तेच्या शिक्षकांना चौथी आणि सहावीतील विद्यार्थ्यांना शिकवावे लागत आहे.

परिणामी इतर इयत्तेत शिकवणार्‍या शिक्षकांवर अतिरिक्त कामाचा बोजा निर्माण होत आहे. या प्रकारामुळे शैक्षणिक अभ्यासावर विसंगत परिणाम दिसून येत असल्याचे पालकाचे म्हणणे आहे. शालेय वर्ग भरले असताना ,शाळेत कार्यालयीन कामे पूर्ण करण्यासाठी लीपिक नसल्याने इतर इयत्तेतील शिक्षकांना कामे करावी लागत असल्याने वर्ग शिकवण्यात अडथळा निर्माण होत आहे.
एकीकडे पालिका शाळेची रंग रांगोटी,सोयी सुविधा काम जोरात चालू आहे. परंतु मुलं आयुष्यात यशस्वी व्हावीत अशी स्वप्नं पाहणार्‍या कामगार वर्गातील पालकांनी या शाळेत मुलांना पाठवल्यावर वर्गात शिक्षक नसेल तर …मुलाची स्वप्नं पूर्ण होणार आहे काय? असा प्रश्न मात्र यावेळी उपस्थित राहतो.

शाळेत बर्‍याच दिवसापासून शाळेत शिकवायला शिक्षक नसल्याने माझ्या मुलीला अभ्यास दिला जात नाही, असे ती सांगते. सहावी इयत्तेत अभ्यासक्रमानुसार शिक्षक भरती होणे आवश्यक आहे. तात्पुरते वेगळ्या इयत्तातील शिक्षक सहावीचा अभ्यास कसे शिकवू शकतात? आम्ही सर्व पालकांनी शिक्षकाची मागणी केली आहे.
                                – भाग्यश्री वाघमारे, सहावी इयत्तेतील विद्यार्थ्याचे पालक

Back to top button