पुणे: साडीच्या वादावर सुप्रिया सुळे यांचं स्पष्टीकरण, भाजप नेत्या चित्रा वाघ यांनाही फटकारलं | पुढारी

पुणे: साडीच्या वादावर सुप्रिया सुळे यांचं स्पष्टीकरण, भाजप नेत्या चित्रा वाघ यांनाही फटकारलं

पुढारी ऑनलाईन: ‘गेल्या काही दिवसांपूर्वी महिला पत्रकारासोबत बोलताना संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर वाद निर्माण झाला होता. त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या खासदार आणि नेत्या सुप्रिया सुळे यांनीही महिला पत्रकारांना साडी का नेसत नाही? असं विधान केलं होतं. या नंतर मोठा वाद निर्माण झाला. अखेर खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर स्पष्टीकरण देत भाजपला जोरदार टोला लगावला.

रविवारी पिंपरी-चिंचवडमध्ये मराठी पत्रकार परिषदेच्या ४३ व्या राष्ट्रीय अधिवेशनात बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी मराठी चॅनेलमधील मुलींनी साडी नेसण्याबद्दल एक विधान केलं होतं. सुळे यांच्या या विधानावरून अनेक राजकीय नेत्यांनी टीका केली होती. तसेच भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनीही टीका करत त्यांचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला. आता या टीकेवर सुप्रिया सुळे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. राजकारणात टीका करणं चुकीचं नाही, तो त्यांचा अधिकार आहे, असे सुळे म्हणाल्या. पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी यांसदर्भात प्रतिक्रिया दिली.

पुढे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ‘माझं भाषण नीट ऐका, एकूण 35 मिनिटांचं हे भाषण होतं. त्यांना माझी विनंती आहे की, पूर्ण ऐकावं. मी संविधानावर विश्वास ठेवणारी आहे. कुणालाही माझ्यावर टीका करण्याचा अधिकार आहे, ते आमचे विरोधक करत आहे. विरोधक काही आमचं कौतुक करणार नाहीत. त्यांनी माझ्यावर फार टीका केली त्या त्याबद्दल काही वाटत नाही. माझी आई मला नेहमी सांगते, निंदकाचे घर हे शेजारी असावे. ते काम विरोधक पूर्ण करत आहेत. सध्याच्या घडीला जगात टेक्नॉलाजी वाढली आहे. पण याचा गैर वापर होत आहे. जर ते 35 मिनिटांचं भाषण हे 17 सेकंदाचं सांगत असतील, तर त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी चित्रा वाघ यांना टोला लगावला. ‘मी कुणाला काहीही बोलले नाही. मी एक मत मांडलं आहे. प्रत्येकाचा तो वैयक्तिक अधिकार आहे, असंही मी त्या भाषणात सुद्धा सांगितलं होतं, असंही सुळेंनी सांगितलं.

 

 

 

Back to top button