पिंपरी : मेट्रोची पुण्याशी कनेक्टिव्हीटी कधी ? | पुढारी

पिंपरी : मेट्रोची पुण्याशी कनेक्टिव्हीटी कधी ?

मिलिंद कांबळे : 

पिंपरी : पिंपरी ते फुगेवाडी मेट्रो सुरू होऊन आठ महिने झाले. त्यापुढे पुण्यापर्यंत मेट्रो अद्याप पोहचलेली नाही. तर, इकडे केंद्र सरकारच्या ‘रेड सिग्नल’मुळे पिंपरी ते निगडीचा विस्तारीत मार्गाचे काम अद्यापही मार्गी नाही. त्यामुळे याविषयी नागरिकांतून नाराजीचा सूर आहे. दरम्यान पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यास मेट्रो कामचे श्रेय घेताना भाजपला शहरवासीयांच्या नाराजीचा सामना करावा लागणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात पिंपरी ते फुगेवाडी अशी 5.8 किलोमीटर अंतर मेट्रो धावत आहे. महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन 6 मार्च 2022 ला मेट्रोची सुरूवात करण्यात आली. अर्धवट मार्गावर मेट्रो सुरू होऊनही अद्याप त्या स्टेशनची कामे सुरूच आहेत. तसेच, नागरिकांच्या प्रतिसादाअभावी मेट्रो रिकामीच धावत आहे. आठ महिने झाले तरी, अद्याप मेट्रो एक स्टेशनही पुढे सरकलेली नाही.
दुसरीकडे, पिंपरी ते निगडी या 4.413 किलोमीटर अंतराच्या कामास महापालिका व राज्य शासनाने दोनदा मंजुरी दिली आहे.

चिंचवड, आकुर्डी व निगडी असे तीन स्टेशन या मार्गावर आहेत. या मार्गाच्या एक हजार 253 कोटी ऐवजी 946 कोटी 73 लाख खर्चाच्या सुधारित प्रस्तावाला महापालिका व राज्य सरकारने मान्यता दिली आहे. केंद्र सरकारने 20 ऐवजी केवळ 10 टक्केच निधी देणार असल्याचे स्पष्ट केले. केंद्राच्या सुचनेमुळे उर्वरित खर्च राज्य शासन व महापालिका उचलणार आहे. त्या सुधारित प्रस्तावाला महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने मे 2021 ला मंजुरी दिली आहे. तत्कालीन महाविकास आघाडीने त्याला ताबडतोब मंजुरी देऊन तो केंद्राकडे पाठविला. मात्र, दीड वर्षे होत आले तरी, अद्याप केंद्राने सुधारित प्रस्तावाला मान्यता दिलेली नाही. पिंपरी ते निगडी मार्गास केंद्राने ‘ग्रीन सिग्नल’ न दिल्याने अद्याप काम सुरू झालेले नाही.

सध्या मेट्रो धावत असली तरी, पुण्यापर्यंत जाता येत नसल्याने शहरातील नागरिकांना काहीच फायदा होत नाही. त्यामुळे सध्या मेट्रो नागरिकांविना रिकामीच धावत आहे. तसेच, पुणे-मुंबई जुना महामार्गावरील 12.50 किलोमीटर अंतराच्या दापोडी ते निगडी या शहराच्या प्रमुख रस्तावर मेट्रो सुरू न झाल्याने नागरिक ‘मेट्रो कनेटिव्हीटी’पासून दूर आहेत. त्यामुळे नागरिक नाराज आहेत. महापालिकेच्या निवडणुका केव्हाही लागू शकतात. शहराताील दापोडी ते निगडी या संपूर्ण मार्गावर मेट्रो धावत नसल्याने आणि पुण्यापर्यंत मेट्रो जोडली न गेल्याने मेट्रोचे श्रेय घेणे भाजपला निवडणुकीत अडचणीचे ठरू शकते.

विस्तारित मार्गामध्ये शहराकडे काणाडोळा

पुणे मेट्रोच्या एकूण 33.11 किलोमीटर अंतराच्या मार्गात शहरात केवळ 7 किलोमीटरचे अंतर आहे. महामेट्रोने दुसर्‍या टप्प्यात पुणे शहरासाठी सहा नव्या मार्गावर विस्तार करण्याचा निर्णय घेतला. त्यात स्वारगेट ते खडकवासला, हडपसर ते खराडी, एसएनडीटी ते चांदणी चौक, शिवाजीनगर ते हडपसर असे 62 कि.मी.चे हे मार्ग आहेत. त्यात शहरातील एकही मार्ग नाही. तसेच, पीएमआरडीएकडून हिंजवडी ते शिवाजीनगर या मार्गाचे काम सुरू आहे. तो मार्ग ही पिंपरी-चिंचवड बाहेरून आहे.
निगडीसह कात्रजचा प्रस्तावही प्रलंबित
पिंपरी ते निगडी या मेट्रोच्या विस्तारीत मार्गाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला आहे. तसेच, पुणे महापालिकेच्या स्वारगेट ते कात्रज या 5.46 किलोमीटर अंतराच्या विस्तारीत मार्गाचाही प्रस्ताव काही महिन्यांपूर्वी केंद्राकडे पाठविला आहे. त्या दोन्ही प्रस्तावाना केंद्राकडून एकाच वेळी मंजुरी मिळण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे.

केंद्राच्या मंजुरीनंतर काम

पिंपरी ते निगडीचा सुधारित प्रस्ताव महापालिका व राज्य सरकारच्या मान्यतेने केंद्र सरकारकडे पाठविला आहे. प्रस्तावासोबत आवश्यक त्या कागदपत्रांची पुर्तता केली आहे. मंजुरी मिळताच निविदा प्रक्रिया राबवून प्रत्यक्ष काम सुरू केले जाईल, असे महामेट्रोचे महाव्यवस्थापक डॉ. हेमंत सोनवणे यांनी सांगितले.

Back to top button