महामार्गालगतची अतिक्रमणे मंचरकरांनी स्वतःहून काढली | पुढारी

महामार्गालगतची अतिक्रमणे मंचरकरांनी स्वतःहून काढली

मंचर; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मंचर शहरातून जाणार्‍या पुणे-नाशिक महामार्गालगत असणारी अतिक्रमणे काढण्याबत व्यावसायिकांना नोटिसा बजावल्या होत्या. त्या नोटिसांना प्रतिसाद देत मंचर शहरातील व्यावसायिकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली आहे. मंचर शहरातून जात असलेल्या पुणे-नाशिक महामार्गावर लगतच्या व्यावसायिकांकडून दुकानांच्या नावाचे बोर्ड लावणे, टपर्‍या उभारणे, छोटे-छोटे पत्रा शेड उभारणे आदी प्रकारची अतिक्रमणे करण्यात आली होती.

यामुळे वाहतुकीस अडथळा होऊ नये, या उद्देशाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अतिक्रमण करणार्‍या व्यावसायिकांना ती काढण्याच्या नोटिसा बजावल्या होत्या. दिलेल्या मुदतीत ही अतिक्रमणे काढली नाही, तर अतिक्रमणविरोधी कारवाई करण्याचा इशाराही संबंधित व्यावसायिकांना दिला होता.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या आतिक्रमणविरोधी कारवाईच्या नोटिसा मिळताच काही व्यापारी व व्यावसायिक एकत्र आले आणि त्यांनी स्वतःहून ही अतिक्रमणे काढण्याबाबत भूमिका घेत इतरांनाही अतिक्रमणे काढण्याची विनंती केली. त्यात बाळासाहेब नाना थोरात, महेश मोरे, मंचर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष अजय घुले, उद्योजक सतीश बेंडे, हॉटेल व्यावसायिक सचिन तोडकर, नीलेश वळसे पाटील, सागर बेंडे, बबू बेंडे, भरत कानडे आदींनी पुढाकार घेतला. त्यांनी संपूर्ण मंचर परिसरात फिरून अतिक्रमणे काढण्याबाबत व्यावसायिकांना आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत अतिक्रमण केलेल्या बहुतेक व्यावसायिकांनी आपआपली अतिक्रमणे स्वतःहून काढून टाकण्यास सुरुवात केली आहे.

मध्यापासून 50 फुटांपर्यंतचे अतिक्रमण काढण्यावर एकमत
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पुणे-नाशिक महामार्गालगत अतिक्रमणविरोधी नोटिसा बजावताना काही ठिकाणी रस्त्याच्या मध्यापासून 40 फुटांवर, तर काही ठिकाणी 50 फुटांवर, तर काही ठिकाणी रस्त्याच्या माध्यपासून 75 फुटांवर अतिक्रमणे काढण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र, यावर मंचरमधील सर्व व्यावसायिकांनी एकत्र येत सर्रास 50 फुटांपर्यंतची अतिक्रमणे काढण्याचा निर्णय घेतला व त्यानुसार अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली आहे.

 

Back to top button