पुणे रेल्वे स्थानकावर सावळा गोंधळ; पार्किंगच्या पावत्या बोगस? | पुढारी

पुणे रेल्वे स्थानकावर सावळा गोंधळ; पार्किंगच्या पावत्या बोगस?

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे रेल्वे स्थानकावर वाहन क्रमांक आणि पार्किंग शुल्क नोंदवले नसतानाच वाहन पार्किंगच्या पावत्या प्रवासी वाहनचालकांना सर्रासपणे दिल्या जात असल्याचे समोर आले आहे. यामुळे रेल्वेच्या पार्किंगच्या उत्पन्नात मोठा झोल होत असल्याचा संशय व्यक्त होत आहे. याद्वारे प्रवासी वाहनचालकांची फसवणूक केली जात असल्याचे स्पष्ट होत आहे. पुण्यातून अनेक नागरिक, चाकरमानी रेल्वे स्थानकावरील पार्किंगमध्ये दिवसभर आपली वाहने पार्क करून बाहेरगावी जातात.

मात्र, रेल्वे स्थानकावर सुरू असलेल्या अशा गैरप्रकारांमुळे प्रवासी वाहनचालकांच्या वाहनांची सुरक्षा आता रामभरोसेच असल्याचे दिसते आहे. एक वाहनचालक प्रवासी रविवारी पहाटे 5 वाजून 47 मिनिटांनी रेल्वेच्या वाहनपार्किंगमध्ये वाहन पार्क करून गेला. त्या वेळी पार्किंगवाल्याने त्या वाहनचालकाला दिलेल्या पावतीवर ना पार्किंगचे शुल्क होते, ना वाहनाचा क्रमांक नोंद होता. त्यामुळे वाहनांची सुरक्षा कशी होणार, तसेच रेल्वे प्रशासनाची लूट आणि प्रवाशांची फसवणूक होत आहे का? असा प्रश्न सुध्दा उपस्थित झाला आहे.

जीएसटी क्रमांकही चुकीचा
रेल्वे स्थानकावर देण्यात आलेल्या पार्किंगच्या पावतीवर देण्यात आलेला जीएसटी क्रमांकसुध्दा चुकीचा आहे. जीएसटी क्रमांकाची ’जीएसटी पोर्टल’वर तपासणी केली असता तो चुकीचा असल्याचे दाखविण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या जीएसटी क्रमांकाचा कोड 27 असून, येथे देण्यात आलेल्या पावतीवरील कोड 36 दाखविण्यात आला. 36 हा कोड दुसर्‍या कोणत्या राज्याचा असता तर तो तरी पोर्टलवर ओरिजनल असल्याचे दिसायला हवे होते. परंतु, पावतीवरील जीएसटी क्रमांक इनव्हॅलिड असल्याचे दाखविण्यात येत आहे. मग, जीएसटीच्या नावाखाली घेण्यात येत असलेला पैसा जातो कुठे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

वाहनाची जबाबदारी आमची नाही
या पावतीवर वाहनचालकांनी स्वत:च्या जबाबदारीवर पार्किंग करावे, वाहनाच्या झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार असणार नाही, असे लिहिले होते. पार्किंगची सुविधा देतो, म्हटल्यावर वाहनचालक येईपर्यंत त्याच्या वाहनाची सुरक्षा करण्याची जबाबदारी पार्किंगवाल्याची असते. मात्र, येथे चक्क पावतीवर टीप लिहून हात झटकले जात असल्याचे दिसत आहे.

सकाळी पुणे रेल्वे स्थानकावरील पार्किंगमध्ये दुचाकी पार्क केली. त्यांनी दिलेल्या पावतीवर पार्किंगचे शुल्क किंवा वाहनाचा क्रमांक नव्हता. तसेच पावतीवर वाहनाची जबाबदारी वाहनचालकाचीच असल्याचे लिहिले होते. पार्किंगवाले वाहनाची जबाबदारी घेत नाहीत, मग यांना आम्ही पार्किंग शुल्क का द्यायचे?

मिलिंद कुलकर्णी, वाहनचालक प्रवासी
पार्किंगच्या पावतीवर वाहनक्रमांक असायला हवा, त्याबाबत पार्किंगचालकांना सूचना दिल्या जातील. तसेच, वाहन पावतीवर शुल्क आऊट करताना देण्यात येत असलेल्या वेगळ्या पावतीवर दिले जाते. त्यासोबतच वाहनचालक आमच्या जागेत वाहन पार्क करतात, त्याचे शुल्क आम्ही घेतो. त्यांच्या वाहनाच्या सुरक्षेची जबाबदारी आमची नाही. जीएसटी क्रमांकाबाबत आम्हाला माहिती नाही, यात काही गोंधळ केला असेल, तर संबंधित ठेकेदाराला दंड घेण्यात येईल.
                    मिलिंद हिरवे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, रेल्वे, पुणे विभाग

 

Back to top button