पुणे : लोकल रेल्वेच्या प्रवाशांचा वाढला ताप | पुढारी

पुणे : लोकल रेल्वेच्या प्रवाशांचा वाढला ताप

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे येथील यार्ड रिमॉडेलिंगच्या कामांमुळे 70 टक्के लोकलची वाहतूक पुणे ऐवजी शिवाजीनगरच्या लोकल टर्मिनलहून करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचा आनंद शिवाजीनगर परिसरातून लोकल प्रवास करणार्‍यांना होणार असला तरी वर्षानुवर्षे पुणे स्टेशनहून लोकलने प्रवास करणार्‍यांचे मात्र हाल होणार आहेत. या प्रश्नाला काही पुणेकरांनी ‘तिसरा डोळा’मधून वाचा फोडत आपल्या तीव भावना व्यक्त केल्या.

पुणे स्टेशनहून प्रवास करणार्‍यांचा वाढला ताण

पुणे स्टेशनवरून सुटणार्‍या बहुतांश लोकल रेल्वेगाड्या आता शिवाजीनगर स्थानकावरून सुटणार आहेत. अगोदरच पुण्याहून लोणावळ्याकडे येणार्‍या गाड्यांची कपात केलेली आहे. त्यामुळे नागरिकांना तास-तासभर वाट पाहून लोकल मिळवावी लागत आहेत. त्यात आता या नव्या निर्णयामुळे स्टेशनहून लोकल प्रवास करणार्‍या रेल्वेप्रवाशांचे मोठे हाल होणार आहेत. पुणे स्टेशनहून लोकल रेल्वेने प्रवास करणार्‍यांमध्ये अनेक अपंग, विद्यार्थी आणि चाकरमानी मंडळींचा समावेश आहे. साहजिकच या सर्वांची जीवनघडी विस्कटणार असून, त्यांना शारीरिक, मानसिक त्रासाबरोबर आर्थिक भुर्दंडही सोसावा लागणार आहे.
                                                                                                                    – एक पुणेकर नागरिक.

रस्त्यावरील वायर्समुळे अपघातांचा धोका
सारसबाग प्रवेशद्वारासमोर अहिल्यादेवी होळकर पुतळ्यापाशी वायरिंगचा ढीग पडलेला आहे. या ढीगामधील वायर्स रस्त्यावर पसरली असून, ती दुचाकीचालकांच्या पायाला अडकून अपघातास कारण ठरू शकते. त्याशिवाय पादचार्‍यांनाही त्याचा अडथळा ठरत आहे. त्यामुळे वायरींचा ढीग त्वरित हलवला पाहिजे.
                                                                                                                    – रत्नाकर चांदेकर, पुणे

पुणे-लोणावळासाठी वेगळी मार्गिका हवी
पुणे स्टेशनहून प्रवास करणार्‍या प्रवाशांचा नव्या निर्णयाने ताण वाढला आहे. कारण शिवाजीनगरपर्यंत रस्तामार्गे शिवाजीनगर स्थानकात पोहोचण्यासाठी लागणारा प्रवास खर्च आणि ती वाहने पकडण्यासाठी करावी लागणारी धावपळ वाढली आहे. रेल्वे प्रशासन या सेक्टरवरील लोकल प्रवाशांच्या प्रती अशी सापत्न भावना का ठेवून आहेत? हे प्रवासीही तिकीट वा पास काढूनच प्रवास करतात; मग त्यांच्याप्रती अनास्था का? पुणे स्टेशनहून लोणावळ्याकरिता वेगळी मार्गिका टाकली तर दोन्ही एक्स्प्रेस आणि लोकल प्रवाशांना सुखकर प्रवास करता येणार आहे.
                                                                                                             प्रकाश दातार, तळेगाव दाभाडे

लोखंडी पाइपाने अडवले पादचारी मार्ग
पटवर्धन बागेसमोरील पादचारी मार्गावर महापालिकेकडून मोठमोठे पाइप टाकण्यात आले आहेत. या पाइपामुळे नागरिकांना पदपथांवरून चालणे अशक्य झाले असून, येथून फिरण्यासाठी आलेल्या ज्येष्ठांना रस्त्यावरून चालावे लागत आहे.

                                                                                                         – प्रवीण पोलेकर, स्थानिक नागरिक

Back to top button