पुणे : 86 चार्जिंग स्टेशनसाठी निविदा प्रक्रिया राबविणार

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शहरात वाढणार्या ई-व्हेईकलची (इलेक्ट्रिक वाहने) संख्या लक्षात घेऊन महापालिका शहरात 500 ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारणार असून, लवकरच 86 चार्जिंग स्टेशनसाठी निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे. ध्वनी आणि वायुप्रदूषण, पेट्रोल, डिझेलपाठोपाठ आता सीएनजी इंधनाचे वाढते भाव, यामुळे नागरिकांकडून ई-व्हेईकल खरेदीला पसंती दिली जात आहे.
तसेच, महापालिकेनेही ई-व्हेईकलसंदर्भात धोरण तयार केले असून, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये ई-बसची संख्या वाढविली जात आहे. पालिकेच्या अधिकारी आणि पदाधिकार्यांसाठी ई-कार खरेदी करण्याचा निर्णय झाला असून, त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. या वाहनांकरिता चार्जिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेच्या मालकीच्या क्षेत्रीय कार्यालयांच्या इमारती, सर्व वाहनतळ, उद्याने, नाट्यगृहे, रुग्णालये या ठिकाणी 500 चार्जिंग स्टेशन उभारली जाणार आहेत.
या चार्जिंग स्टेशनमध्ये दुचाकी, चारचाकी वाहनांसाठी प्रत्येकी दोन चार्जिंग पॉइंट असतील. एक जागा वेटिंगसाठी असणार आहे. या सुविधेसाठी नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने पैसे भरावे लागणार आहेत. पहिल्या टप्प्यात 86 चार्जिंग स्टेशनसाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबविली जाणार असल्याचे विद्युत विभागाचे प्रमुख श्रीनिवास कंदूल यांनी सांगितले.