कुदळवाडीत गोवर संशयित रुग्ण पालिकेकडून शोधमोहीम | पुढारी

कुदळवाडीत गोवर संशयित रुग्ण पालिकेकडून शोधमोहीम

चिखली : पुढारी वृत्तसेवा : कुदळवाडीत गोवर या संसर्गजन्य आजाराचे संशयित रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याची माहिती पालिकेच्या वैद्यकीय अधिकार्‍यांना देण्यात आल्यानंतर पालिकेच्या बालरुग्ण कक्षालयातील डॉक्टरांनी कुदळवाडी परिसरात मुलांची तपासणी मोहीम राबविण्यात आली. यावेळी गोवर आजार आणि त्याचे लसीकरण याबाबत माहिती देण्यात आली तसेच आजाराबाबत घ्यावयाची काळजी आणि पालिकेच्या उपाययोजना यांचाही आढावा यावेळी घेण्यात आला. पालिकेच्या वैद्यकीय पथकाने गोवर आजाराची लक्षणे आढळून आलेल्या बालकांचे रक्ताचे नमुने घेतले आणि त्यांची पुढील प्रक्रिया राबविण्यासाठी अधिकार्‍यांनी सूचना केल्या.

काही भागांत जुन्या विचारसरणीने प्रभावित काही नागरिकांकडून लस घ्यायला विरोध केला जातो, अशा काही केसेसमधे त्यांना लसीकरणाचे महत्त्व पटवून देण्यात येईल, असेही सांगण्यात आले.

चिखली भागातील लहान मुलांना ताप असण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने त्यांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले असून, खबरदारीची बाब म्हणून व्यापक तपासणी मोहीम सुरू राहणार आहे. ज्यांना गोवर असल्याचे निष्पन्न होईल, त्यांच्यावर उपचार करण्यात येणार आहेत. लसीकरण मोहीम तीव— करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
                                                 -पवन साळवे, वैद्यकीय अधिकारी

चिखली भागात पालिकेचे रुग्णालय नसून,त्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जाणे भाग आहे.पालिकेच्या वतीने गोवर आजाराच्या विरोधात मोहीम राबविण्यात येत असून,पुढील काळात व्यापक लसीकरण होणे गरजेचे आहे.या भागातील नागरीकरण लक्षात घेता तातडीची बाब म्हणून नागरिकांच्या वैद्यकीय समस्या सोडविण्यासाठी मिनी रुग्णालय सुरू करण्याची गरज आहे.
                                                  -दिनेश यादव, माजी प्रभाग सदस्य

Back to top button