माळेगावला 517 चालकांकडून साडेचार लाखांचा दंड वसूल | पुढारी

माळेगावला 517 चालकांकडून साडेचार लाखांचा दंड वसूल

माळेगाव; पुढारी वृत्तसेवा : माळेगाव नगरपंचायत परिसरात वाहतुकीचे नियम मोडणार्‍या 517 जणांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. त्यांच्याकडून सुमारे पावणेचार लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. अठरा वर्षांच्या आतील मुला-मुलींना वाहन चालविण्यास देणार्‍या पालकांवर खटला भरण्याचा इशारा वाहातूक पोलिसांनी दिला आहे.

माळेगाव पोलिस ठाण्यांतर्गत कार्यरत असणार्‍या वाहतूक पोलिसांकडून विनापरवाना वाहन चालविणे, ट्रिपल सीट, हेल्मेट न वापरणे, बिगर नंबरप्लेटची गाडी, अतिरिक्त ऊस वाहतूक करणारे टॅक्टरचालक व अतिरिक्त प्रवासी वाहतूक करणार्‍यांवर मोटार वाहन अधिनियमांतर्गत विविध कलमांनुसार दंडात्मक कारवाई केली. याद्वारे सुमारे 3 लाख 75 हजार 500 रुपये दंड वसूल केला.

मद्यपान करून वाहन चालविण्यार्‍या तिघांवर कारवाई करण्यात आली. ऊसवाहतूक करणार्‍या ट्रॅक्टर बैलगाड्यांच्या चालकांनी रिफ्लेक्टर न बसविल्यास कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे व प्रभारी अधिकारी किरण अवचर यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलिस अमजद शेख, काका पाटोळे, अमोल राऊत यांनी केली. कारवाईत सातत्य राखल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

Back to top button