पिंपरी : शहराचे सांस्कृतिक धोरण कागदावरच ! नऊ वर्षांपासून अंमलबजावणीच्या प्रतीक्षेत | पुढारी

पिंपरी : शहराचे सांस्कृतिक धोरण कागदावरच ! नऊ वर्षांपासून अंमलबजावणीच्या प्रतीक्षेत

वर्षा कांबळे :

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, शहराचा सांस्कृतिकदृष्ट्या विकास व्हावा, या उद्देशाने महापालिकेने 2013 साली सांस्कृतिक धोरण तयार केले. शहरामध्ये पुण्याप्रमाणे सांस्कृतिक चळवळ जोर धरु पहात आहे. मात्र, महापालिका कला धोरणाच्या माध्यमातून कलाकारांना उभारी देण्यासाठी उदासीन असल्याची खंत शहरातील कलाकार मंडळी व्यक्त करत आहेत. शहरात सांस्कृतिक कार्यक्रम व्हावे कलाकारांना संधी मिळावी यादृष्टीने शहराचे सांस्कृतिक धोरण तयार करण्यात आले होते. शहराची या सांस्कृतिक धोरणाच्या अनुषंगाने वेगळी ओळख व्हावी आणि नवनवीन कलाकार घडावेत, हा या धोरणाचा उद्देश आहे. पिंपरी कला धोरणानुसार कार्यक्रमांचे स्वरुप ठरवण्यात आले होते. शहराचे सांस्कृतिक धोरण जाहीर झाले त्यानंतर कार्यक्रमांकरिता वेगळी आर्थिक तरतुद केली जायची. त्यानुसार अगदी दोन तीन वर्षेच विविध कार्यक्रम राबवण्यात आले. मात्र नंतर धोरणाची अंमलबजावणी झाली नाही.

सवलतीच्या दरात नाट्यगृह देण्याची तरतूद

शहराच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचा विचार केला असता 1988 पासून महापालिकेने स्वरसागर महोत्सवाची सुरुवात केली. महापालिकेच्या निगडी येथे संत तुकाराम महाराज संकुल याठिकाणी 2001 मध्ये संगीत अकादमीची स्थापनाही केली.
तसेच कलाधोरणांतर्गत शहरातील होतकरु कलावंतांना आणि त्यांच्या कलाविषयक उपक्रमांना सवलतीच्या दरात मनपा नाट्यगृहे, सांस्कृतिक हॉल देण्याची तरतूद धोरणात आहे.

धोरणामागचा उद्देश

शहरात सांस्कृतिक कार्यक्रम व्हावे, कलाकारांना संधी मिळावी, यादृष्टीने शहराचे सांस्कृतिक धोरण तयार करण्यात आले होते. शहराची या सांस्कृतिक धोरणाच्या अनुषंगाने वेगळी ओळख व्हावी आणि नवनविन कलाकार घडावे हा या धोरणाचा उद्देश आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेने शहराचे सांस्कृतिक आणि कला धोरण निश्चित करण्याकरिता कला धोरणाची पहिली बैठक 23 जानेवारी 2013 मध्ये झाली. त्यावेळी कला धोरणाची कार्यप्रणाली ठरवण्यात आली होती. त्यानुसार कार्यक्रमांचे स्वरुप ठरवण्यात आले होते. त्यानुसार अगदी दोन तीन वर्षेच विविध कार्यक्रम राबवण्यात आले. त्यानंतर हे धोरण कागदावरच राहिले आहे.

शहरीकरणानुसार धोरणातही बदल अपेक्षित

महापालिकेच्या वतीने सुरुवातीच्या काळातील परिस्थितीचा विचार करत कला धोरणाची आखणी केली होती. आता शहर स्मार्ट सिटी होत असताना जशी परिस्थिती बदलत आहे त्यानुसार या सांस्कृतिक धोरणातही बदल अपेक्षित आहे. तसेच शहरातील कलाकारांची आकडेवारी, स्थिती , शहराची सांस्कृतिक गरज लक्षात घेत त्याप्रमाणे नियोजन अपेक्षित आहे. या धोरणात नमूद केल्याप्रमाणे सर्व कलाप्रकारांचा समावेश यात केला आहे. याबाबत आयुक्त शेखर सिंह यांच्याशी संपर्क केला असता संपर्क होवू शकला नाही.

 

 

 

 

 

 

 

 

Back to top button