ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरचालकांची कसरत | पुढारी

ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरचालकांची कसरत

टाकळी हाजी; पुढारी वृत्तसेवा : सध्या रस्त्याने ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरची लगबग पाहावयास मिळत आहे. टाकळी हाजी (ता. शिरूर) येथे गावातील मुख्य रस्त्याचे काम सुरू असून, बसस्टँड परिसरात एका बाजूने रस्ता जवळपास पाच ते सहा फुटांपर्यंत खोदलेला आहे. परिणामी, ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरचालकांची कसरत होत आहे.

टाकळी हाजी बसस्टँड परिसरात प्राथमिक आरोग्य केंद्र, तसेच अनेक दुकाने आहेत. त्यामुळे नेहमीच गर्दी असते. येथे ऊस वाहतूक करणार्‍या वाहनांची कसरत पाहावयास मिळत आहे. ट्रॅक्टरसोबत दोन ट्रेलर जोडलेले असतात. या ट्रॅक्टर वाहतूकदारांना नियमावलीचे पालन करण्याविषयी कोणतेही गांभीर्य नसल्याचे निदर्शनास येत आहे. ट्रेलर भरताना क्षमतेपेक्षा जास्त भरले जात असून, यामुळे चढाच्या ठिकाणी ट्रॅक्टरची दमछाक होत आहे.

अशा वेळी डबल ट्रॅक्टर लावून काही अंतर पार केले जाते. दुसर्‍या बाजूने रस्ता कामासाठी खोदला असल्याने अनर्थ होण्याची संभावना आहे. शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांची आणि वाहनांची गर्दी असताना ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर आला, तर मात्र वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे वाहनमालकांनी आणि कारखान्याच्या संबंधित व्यवस्थापनाने लक्ष घालून खबरदारीच्या उपाययोजना करणे गरजेचे आहे.

ट्रॅक्टर पुढून अर्धा वर उचलून चालविण्याचा प्रकार
प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात चढ असल्याने ट्रॅक्टर पुढच्या बाजूने अर्धा वर उचलून फक्त मागच्या चाकांवर कसरत करीत चालक चालवत आहेत. हे दृश्य पाहण्यासाठी रस्त्याच्या बाजूला बघ्यांची गर्दी होत असते.

 

Back to top button