उरुळी कांचन : पूर्व हवेलीत गहू बियाणे मिळेना | पुढारी

उरुळी कांचन : पूर्व हवेलीत गहू बियाणे मिळेना

उरुळी कांचन; पुढारी वृत्तसेवा : पूर्व हवेली तालुक्यातील कृषी सेवा केंद्रांत नामांकित कंपन्यांची गहू बियाण्यांची उपलब्धता नसून पेरणी रखडली आहे. दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे. कृषी सेवा केंद्रात अपवादात्मक एक दुसर्‍या पिकाचे बियाणे उपलब्ध आहे. पूर्व हवेलीत परतीचा पाऊस उशिरापर्यंत थांबल्याने गव्हाच्या पेरण्यांना उशीर झाला. नोव्हेंबर महिना अखेरच्या टप्प्यात आला असताना आता पुन्हा दर्जेदार बियाण्यांच्या कमतरतेमुळे शेतकर्‍यांना पेरणीपासून वंचित राहावे लागत आहे. उरुळी कांचन, अष्टापूर, कुंजीरवाडी, थेऊर या ठिकाणी कृषी केंद्रात प्रामुख्याने ही समस्या जाणवत आहे.

शेतकर्‍यांच्या पसंतीचे बियाणे नसल्याने शासनाने रब्बीची केलेली तयारी वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे. कमी दर्जाचे बी पेरण्यापेक्षा घरचे बी पेरण्यास काही शेतकरी प्राधान्य देत आहेत. मात्र यामुळे उत्पादनात घट होऊन शेतकर्‍यांनाही आर्थिक फटका बसणार असल्याची चर्चा सुरू आहे. यंदा जागतिक पातळीवर रशिया-युक्रेन युद्धामुळे गव्हाला चांगला बाजारभाव मिळत असताना शेतकर्‍यांना याचा लाभ होणार नसल्याचेही बोलले जात आहे. कंपनी व वितरकांनी जाणीवपूर्वक बियाणे बाजारात कमी प्रमाणात आणले आहे का ? त्यामुळे गहू बीजाची कृत्रिम टंचाई निर्माण केली जात आहे काय, अशी चर्चा सध्या शेतकर्‍यांमध्ये सुरू आहे.

कृषी केंद्रांत नामवंत कंपन्यांच्या बियाण्यांचा पुरवठा झाला नसल्याची बाब खरी आहे. मात्र शेतकर्‍यांना पुरेल असा दर्जेदार बियाण्यांचा साठा कृषी केंद्रात आहे. इतर पुरवठादार कंपन्यांचाही साठा असून तो वापरण्यास कसलीही हरकत नाही. नामवंत कंपन्यांचा साठा असून ज्यादा दराने विकत असेल तर अशा दुकानांवर तातडीने कारवाई करू.

                                                – अनिल देशमुख, कृषी विकास अधिकारी, जिल्हा

Back to top button