उरुळी कांचनसह सात गावांची वीज गायब | पुढारी

उरुळी कांचनसह सात गावांची वीज गायब

यवत/उरुळी कांचन; पुढारी वृत्तसेवा : वीजबिल थकल्याने यवत परिसरातील शेतकर्‍यांचा शेतीपंपाचा वीजपुरवठा बंद केल्याने चिडलेल्या शंभरहून अधिक शेतकर्‍यांनी यवत वीज उपकेंद्रावरून उरुळी कांचनला येणारा ’एसबी स्विच’ बंद पाडल्याने उरुळी कांचनसह 7 गावांचा वीजपुरवठा सहा तासांहून अधिक वेळ बंद आहे. रात्री उशिरापर्यंत यावर काही तोडगा निघू शकला नव्हता. परिणामी, लाखो लोकसंख्या असलेले उरुळी कांचन शहर रात्री उशिरापर्यंत अंधारात बुडाले आहे.

यवत परिसरातील शेतकर्‍यांनी वीज महावितरणने तोडली म्हणून, तुमची वीज नको आणि आमच्या शेतात वीजवितरणचे खांबही नको, अशी भूमिका घेत उरुळी कांचन शहराला जोडलेला एसबी स्विच शेतकर्‍यांनी बंद पाडला. या स्थितीमुळे उरुळी कांचन, आष्टापूर, कोरेगाव मूळ आदी 7 गावांतील वीजपुरवठा ठप्प झाला आहे. दौंड तालुक्यातील महावितरणने शनिवारी सकाळपासून कोणतीही पूर्वसूचना न देता थकीत कृषिपंपांची वीजतोडणी मोहीम हाती घेतली आहे. यामुळे यवत परिसरातील शेतकरी आक्रमक झाले होते.

या भागातील शेतकर्‍यांनी यवतमधील उपकेंद्र परिसरात जमत महावितरणच्या अधिकर्‍यांना निवेदन देऊन वीजपुरवठा सुरू करण्याची मागणी केली. परंतु, महावितरणच्या अधिकार्‍यांनी ही मोहीम वरिष्ठपातळीवरील असल्याचे सांगितल्याने शेतकर्‍यांनी यवत पोलिस स्टेशनमध्ये दाखल होत महावितरणच्या विरोधात आंदोलन करायचे निवेदन यवत पोलिसांना दिले.

परंतु, यावर महावितरण व पोलिस काहीच दखल घेत नाहीत, असे लक्षात आल्यानंतर यवत परिसरातील शेतकर्‍यांनी दोरगेवाडी येथील यवत उपकेंद्रातून हवेली तालुक्यातील उरुळी कांचन व इतर गावांना होणारा मुख्य विद्युतप्रवाह खंडित केला. रात्री उशिरापर्यंत महावितरणचे अधिकारी यवत पोलिस स्टेशनमध्ये हजर राहून यावर काय तोडगा काढता येईल, हे पाहत होते. कांदा लागवड व इतर पिकांना पाणी देत असताना महावितरणने केलेली वीजतोडणी यामुळे शेतकरीवर्गात कमालीची नाराजी पाहायला मिळत होती.

उरुळी कांचनला स्वतंत्र उपकेंद्र मागणी अपूर्णच
उरुळी कांचनसह पूर्व हवेलीत वळती उपकेंद्रावर अतिरिक्त भार असल्याने उरुळी कांचन, कोरेगाव मूळ, आष्टापूरसह उर्वरित गावांना यवत उपकेंद्रातून पुरवठा होत आहे. उरुळी कांचनसह परिसरात वीजपुरवठा उपलब्ध करण्यासाठी एक स्वतंत्र उपकेंद्राची गरज आहे. परंतु, या ठिकाणी प्रयत्न होत नसल्याची स्थिती आहे. पुरंदर उपसा योजनेच्या अतिरिक्त वीज पुरवठ्यातून विजेचा प्रश्न निकाली निघू शकतो. पण, यासाठीचे प्रयत्न होत नाहीत.

Back to top button