कृष्णानगरमधील रस्त्यावरील वाहतूक तातडीने पूर्ववत करा | पुढारी

कृष्णानगरमधील रस्त्यावरील वाहतूक तातडीने पूर्ववत करा

कोंढवा; पुढारी वृत्तसेवा : कृष्णानगरमधून जाणार्‍या रस्त्याच्या मध्यभागी असलेला व्हॉल्व्ह नादुरुस्त झाला होता. यामुळे हा रस्ता गेल्या काही दिवसांपासून वाहतुकीसाठी बंद केला होता. बाजूच्या खासगी जागेतून सध्या वाहतूक सुरू आहे. सध्या या व्हॉल्व्हची दुरुस्ती झाली असली, तरी मूळ रस्त्यावरून वाहतूक सुरू केली नाही. ही वाहतूक तातडीने सुरळीत करण्याची मागणी नागरिकांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते अतुल तरवडे यांनी महापालिकेकडे केली आहे.

कृष्णानगर तरवडेवस्ती रस्त्यावर पाण्याचा व्हॉल्व्ह आहे. तो नादुरुस्त झाल्यामुळे महापालिका प्रशासनाने काम होईपर्यंत हा रस्ता बंद केला होता. यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी होत होती. नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन रस्त्याच्या बाजूला असणारे शेतकरी पोपटराव आंबेकर यांनी जेसीबीने स्वत:च्या जागेतून नागरिकांना रस्ता करून दिला. यामुळे वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली होती.

सध्या व्हॉल्व्ह दुरुस्तीचे काम होऊन बरेच दिवस झाले आहेत. मात्र, खड्डा व त्या ठिकाणची परिस्थिती पाहून महापालिका प्रशासनाने मूळ रस्ता वाहतुकीसाठी सुरू करायला हवा होता. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. व्हॉल्व्ह नादुरुस्त झाल्यामुळे कृष्णानगर रस्त्यावर व बाजूच्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. प्रशासनाने या रस्त्याची दुरुस्ती करून मूळ रस्त्यावरून वाहतूक सुरू करावी, मागणी तरवडे यांनी केली आहे.

Back to top button