पाणी कधी येईल याचा नेमच नाही! कात्रज परिसरामधील नागरिकांची व्यथा | पुढारी

पाणी कधी येईल याचा नेमच नाही! कात्रज परिसरामधील नागरिकांची व्यथा

पुणे; पुढारी वृत्तसेवा : वृत्तपत्रांत बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर चार, पाच दिवस पाणीपुरवठा सुरळीत केला जातो. त्यानंतर पुन्हा परिस्थिती ‘जैसे थे’ होते. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने आम्हाला विनापाणी ठेवण्याचे ठरविले आहे का?,’ असा उद्वीग्न सवाल कात्रज परिसरातील संतोषनगर भागातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.

पाणीपुरवठा विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे या भागातील नागरिक ऐन दिवाळीत पाण्यापासून वंचित राहिले होते. त्यानंतर दैनिक ‘पुढारी’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर या भागातील पाणीपुरवठा सुरळीत झाला होता. मात्र, काही दिवस लोटल्यानंतर पुन्हा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. संतोषनगर भागातील नागराज मंदिर परिसरात सध्या दिवसाआड पाणीपुरवठा होत असून, तोदेखील कमी दाबाने होत असल्याचे रहिवाशांनी सांगितले.

पाणी सोडण्याच्या वेळादेखील या भागात निश्चित नाहीत. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. याबाबत पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांकडे तक्रार करूनही उपयोग होत नाही. दिवसभरात कधी पाणी येईल याचा नेमच नाही. यामुळे संपूर्ण दिवस पाण्याची वाट पाहण्यात जात असल्याची व्यथा रहिवाश्यांनी सांगितली. याबाबत पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता कुणाल यादव यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

Back to top button