पुणे : पाच दिवसांत दोन लाखांचा दंड वसूल अनधिकृत | पुढारी

पुणे : पाच दिवसांत दोन लाखांचा दंड वसूल अनधिकृत

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शहरातील अनधिकृत जाहिरातबाजीला आळा घालण्यासाठी महापालिकेने हाती घेतलेल्या मोहिमेंतर्गत पाच दिवसांत 436 फ्लेक्स, 26 होर्डिग्ज, 925 बोर्ड, 432 बॅनर याप्रमाणे 1 हजार 819 वर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत 2 लाख 2 हजार रुपयांचा दंडही वसूल करण्यात आल्याची माहिती महापालिका अधिकार्‍यांनी दिली आहे. महापालिका हद्दीमध्ये फ्लेक्स, होर्डिग्ज, बोर्ड, बॅनर आदी लावण्यासाठी परवाना विभागाकडून सशुल्क परवानगी दिली जाते.

मात्र, शहरात सर्वत्र महापालिकेची परवानगी न घेता अनधिकृतपणे जाहिरातबाजी केली जाते. राजकीय पक्ष, स्थानिक नेते, कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्याप्रमाणेच विविध स्वयंसेवी संस्था, शिक्षण संस्था आदींकडून अनधिकृत जाहिरातबाजी केली जाते. यामुळे महापालिकेचे नुकसान होतेच, त्याशिवाय शहराचे विद्रुपीकरणसुद्धा होते. अशा अनधिकृत जाहिरातबाजांवर महापालिकेकडून कारवाई करून दंड वसूल केला जातो. तसेच संबंधितांवर गुन्हेही दाखल केले जातात. आजवर प्रति 10 जाहिरातींमागे एक हजार रुपये दंड केला जात होता. मात्र, राजकीय दबावापोटी कारवाई केली जात नव्हती.

दरम्यान, शहरात जानेवारी महिन्यात जी-20 आंतरराष्ट्रीय परिषद होणार आहे, त्यापूर्वी शहराचे विद्रुपीकरण रोखण्यासाठी आणि अनधिकृत जाहिरातबाजीला लगाम लावण्यासाठी महापालिकेने प्रतिजाहिरात एक हजार रुपये दंड वसूल करण्यास मान्यता दिली आहे. तसेच संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचेही आदेश दिले आहेत. मात्र, अपेक्षित कारवाई होत नसल्याने महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी आकाशचिन्ह व परवाना विभागाला कारवाईचा दैनंदिन अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत.

मात्र, चालढकल सुरूच असल्याने आयुक्तांनी पुढील सात दिवसांत शहरात फ्लेक्स आणि अनधिकृत जाहिराती हटवून शहर स्वच्छ करा, अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरे जा, असा इशारा आकाशचिन्ह विभागासह परिमंडळ उपायुक्तांना दिला आहे. त्यानंतर प्रशासनाने 14 ते 18 नोव्हेंबर या कालावधीत 436 फ्लेक्स, 26 होर्डिग्ज, 925 बोर्ड, 432 बॅनर याप्रमाणे 1 हजार 819 कारवाया केल्या. या कारवाईत 2 लाख 2 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

Back to top button