पुणे : अधिसभा निवडणुकीसाठी आज मतदान; दहा जागांसाठी 71 केंद्रांवर प्रक्रिया | पुढारी

पुणे : अधिसभा निवडणुकीसाठी आज मतदान; दहा जागांसाठी 71 केंद्रांवर प्रक्रिया

पुणे; पुढारी वृत्तसेवा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीसाठी रविवारी (दि. 20) सकाळी 10 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे. मतदान प्रक्रियेची सर्व तयारी विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आली असून, मतपेट्यांसह निवडणूक प्रतिनिधी आपापल्या केंद्रांवर रवाना झाले. अधिसभेसाठी पदवीधरांमधून दहा उमेदवार अधिसभेवर निवडून देण्यासाठी ही निवडणूक होत आहे.

पुणे, अहमदनगर आणि नाशिक व सिल्वासा येथे विद्यापीठातील 200 हून अधिक निवडणूक प्रतिनिधी, केंद्र निरीक्षकांच्या देखरेखीखाली, तसेच पोलिसांच्या सुरक्षेत ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. दरम्यान, मतदान नोंदणी दरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास कडक कारवाई केली जाईल, असे विद्यापीठ निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले. सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सर्व केंद्रांवर ही मतदान प्रक्रिया होणार आहे. ज्यांना मतदानासाठी ड्युटी लावण्यात आली आहे त्या कर्मचार्‍यांचे मतदान केंद्र कोणतेही असले, तरी त्यांना ड्युटीवर असलेल्या मतदान केंद्रावरच मतदान करता येणार आहे.

दहा जागांसाठी 37 उमेदवारांचे अर्ज

पदवीधर मतदारसंघातून अधिसभेच्या दहा जागांसाठी एकूण 37 उमेदवारांचे अर्ज दाखल झाले असून, त्यामध्ये पाच खुल्या जागांसाठी 18 उमेदवार, एका अनुसूचित जाती प्रवर्गासाठी पाच उमेदवार, एका अनुसूचित जमाती प्रवर्गातील जागेसाठी 4 उमेदवार, विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील एका जागेसाठी 4 उमेदवार, इतर मागास प्रवर्गासाठी एका जागेसाठी चार उमेदवार, तर महिला प्रवर्ग एका जागेसाठी दोन उमेदवारांनी अर्ज भरले आहेत.

या निवडणुका निष्पक्ष व पारदर्शी होण्यासाठी सर्व तयारी विद्यापीठाने पूर्ण केली असून, या वेळी विक्रमी मतदान होण्याची अपेक्षा आहे. पदवीधरांनी निर्भिडपणे मतदान करावे.

                                                                   – डॉ. प्रफुल्ल पवार,
                                                        कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी

मतदान कोठे?
पुणे शहर, पुणे ग्रामीण, अहमदनगर, नाशिक, सिल्वासा

मतदान केंद्रांची यादी कोठे पाहता येईल?
www.unipune.ac.in या संकेस्थळावर

किती जागांसाठी मतदान?
10 जागांसाठी 37 उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

किती पदवीधरांची नोंदणी?
88 हजार 831अशी आहेत मतदान केंद्रे
एकूण मतदान केंद्रे – 71, पुणे शहर- 26
पुणे ग्रामीण – 10, नाशिक – 19
अहमदनगर – 15, सिल्वासा – 1

निवडणुकीसाठी त्रिस्तरीय यंत्रणा
विभागीय निरीक्षक- 4, केंद्र निरीक्षक – 74
बूथ प्रतिनिधी – 114, सुरक्षारक्षक – 500
पोलिस कर्मचारी- 120

Back to top button