पुणे : विधी अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया रेंगाळली | पुढारी

पुणे : विधी अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया रेंगाळली

पुणे : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात सीईटी सेलच्या माध्यमातून राबविण्यात येणारी विधी अभ्यासक्रमासाठीची प्रवेश प्रक्रिया रेंगाळली आहे. तीन वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी उपलब्ध जागांपेक्षा पाचपट, तर पाच वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी उपलब्ध जागांपेक्षा अधिक अर्ज असतानाही प्रवेश प्रक्रिया कासवगतीने का सुरू आहे? असा प्रश्न विद्यार्थी आणि पालक विचारत आहेत.

विधीच्या तीन वर्षे अभ्यासक्रमाच्या दुसर्‍या फेरीची अंतिम गुणवत्ता यादी 18 नोव्हेंबरला जाहीर करण्यात आली. 21 नोव्हेंबरला विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी महाविद्यालये देण्यात येतील. 22 ते 25 नोव्हेंबरदरम्यान प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण होईल. महाविद्यालये विद्यार्थ्यांचे प्रवेश 22 ते 28 नोव्हेंबरदरम्यान पोर्टलवर नोंद करतील आणि त्यानंतर 29 तारखेपासून संस्थास्तरावरील प्रवेश सुरू होतील. प्रवेशासाठी 10 डिसेंबरची अंतिम तारीख देण्यात आली आहे. विधीच्या पाच वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी दुसर्‍या फेरीचे प्रवेश 18 नोव्हेंबरला पूर्ण झाले.

आता महाविद्यालये 21 नोव्हेंबरपर्यंत पोर्टलवर नोंद करतील आणि त्यानंतर 23 तारखेपासून संस्थास्तरावरील प्रवेश सुरू होतील. प्रवेशासाठी 8 डिसेंबरची अंतिम तारीख देण्यात आली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांत आता कायद्याचा अभ्यास केलेली व्यक्ती गरजेची असते. त्यामुळे विधी क्षेत्राचा विस्तार वाढत असून, विधीच्या विद्यार्थ्यांची मागणीही दिवसागणिक वाढत आहे. बहुसंख्य विद्यार्थी कायद्याचे ज्ञान मिळावे, या उद्देशाने जोड शिक्षण म्हणूनही विधी अभ्यासक्रमाला प्रवेश घेत आहेत.

काही वर्षांपूर्वी विधी हे क्षेत्र सरकारी कामकाजापुरते मर्यादित होते. परंतु, आता राज्यात विविध कंपन्यांमध्ये विधी विभाग स्थापन करण्यात आल्यामुळे नोकरीच्या असंख्य संधी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे विधी प्रवेशाकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढला असला, तरी प्रवेश प्रक्रियेतील गोंधळामुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप होत असल्याचे दिसून येत आहे.

विधी तीन वर्षे प्रवेश प्रक्रिया दृष्टिक्षेपात

  • प्रवेशासाठी मान्यताप्राप्त महाविद्यालये 152
  • प्रवेशासाठी नोंदणी 47 हजार 559
  • प्रवेशासाठी अर्ज लॉक केलेले 43 हजार 93
  • अर्जांची पडताळणी केलेले 38 हजार 507
  • पसंतीक्रम नोंदविलेले 30 हजार 563
  • प्रवेशासाठी उपलब्ध जागा 16 हजार 960
  • आत्तापर्यंत झालेले प्रवेश 6 हजार 191
  • प्रवेशासाठी उपलब्ध जागा 9 हजार 338
  • प्रवेशासाठी व्यवस्थापनाच्या 1 हजार 431
    उपलब्ध जागा

विधी पाच वर्षे प्रवेश प्रक्रिया दृष्टिक्षेपात

  • प्रवेशासाठी मान्यताप्राप्त महाविद्यालये 134
  • प्रवेशासाठी नोंदणी 14 हजार 857
  • प्रवेशासाठी अर्ज लॉक केलेले 13 हजार 140
  • अर्जांची पडताळणी केलेले 12 हजार 456
  • पसंतीक्रम नोंदविलेले 7 हजार 901
  • प्रवेशासाठी उपलब्ध जागा 11 हजार 880
  • आत्तापर्यंत झालेले प्रवेश 6 हजार 490
  • प्रवेशासाठी उपलब्ध जागा 5 हजार 390

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा लवकर प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया रेंगाळली, असे म्हणता येणार नाही. सध्या प्रवेशाच्या दोनच फेर्‍या झाल्या असून,
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा प्रवेश प्रक्रिया लवकर पूर्ण होण्याची शक्यता आहे.

                                                                – डॉ. क्रांती देशमुख,
                                               प्राचार्या, शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय

Back to top button