

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुण्यापासून काश्मीरपर्यंत विविध सामाजिक कार्यात नेहमीच आघाडीवर असलेल्या इंद्राणी बालन फाउंडेशन (पुणे) आणि पुनीत बालन ग्रुप यांच्या वतीने आंबेगाव येथील माजी विद्यार्थी विकास प्रबोधनी व ग्रामपंचायत लोणी यांना सुमारे 15 लाख रुपये किमतीची रुग्णवाहिका देण्यात आली.
'इंद्राणी बालन फाउंडेशन'चे अध्यक्ष आणि उद्योजक पुनीत बालन, तसेच माजी विद्यार्थी विकास प्रबोधनीचे अध्यक्ष उदयसिंह वाळुंज यांच्या हस्ते पुण्यात या रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. सरपंच ऊर्मिला धुमाळ यांच्याकडे त्यांनी औपचारीकपणे या रुग्णवाहिकेची चावी दिली. या वेळी माजी सरपंच उद्धवराव लंके, चेतन लोखंडे, अशोक पाटील, राष्ट्रपती पदक विजेते सेवानिवृत्त पोलिस अधिकारी किसन गायकवाड, सावळेराम नाईक, दिलीप वाळुंज, बाळासाहेब गायकवाड, पिंटू पडवळ, उद्योजक राजू वाळुंज, यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
या वेळी इंद्राणी बालन फाउंडेशन, आरएमडी फाउंडेशन यांच्या वतीने लोणी येथे करण्यात येणार्या विविध विकासकामांची माहिती देताना उदयसिंह वाळुंज म्हणाले, 'इंद्राणी बालन फाउंडेशन आणि आरएमडी फाउंडेशन' यांच्या वतीने कोट्यवधी रुपये खर्च
करून भैरवनाथ विद्याधाम विद्यालयासाठी सुसज्ज इमारत बांधण्याचे काम सुरू आहे.
यामुळे विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय होण्यास मदत होणार आहे. मआरएमडी फाउंडेशनफच्या वतीने परिसरात सात हजार वृक्ष लागवड करण्यात आल्याची माहितीही या वेळी देण्यात आली. बेल्हे-जेजुरी महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या परिसरातील सात-आठ गावांना तातडीने वैद्यकीय सेवा मिळण्यास या रुग्णवाहिकेमुळे मदत होणार असल्याचे चेतन लोखंडे यांनी सांगितले. अविनाश वाळुंज यांनी सूत्रसंचालन केले. उदयसिंह वाळुंज यांनी आभार मानले.
कोणत्याही अपघातातील जखमीला 'गोल्डन अवर'मध्ये उपचार मिळाले, तर त्याचा जीव वाचू शकतो. याच भावनेतून ही रुग्णवाहिका देण्यात आली आहे. यामुळे अपघातातील जखमींसोबतच इतर रुग्णांनाही वेळेत उपचार मिळण्यासाठी मदत होईल, असा विश्वास आहे.
पुनीत बालन अध्यक्ष,
इंद्राणी बालन फाउंडेशन-