पुणे : जि.प.च्या आढावा बैठकीला खातेप्रमुखांची दांडी | पुढारी

पुणे : जि.प.च्या आढावा बैठकीला खातेप्रमुखांची दांडी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेचे प्रशासक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी बोलावलेल्या बैठकीला तब्बल आठ विभागांच्या खातेप्रमुखांनी दांडी मारली. त्याची गंभीर दखल घेऊन या सर्व अधिकार्‍यांना नोटीस बजावली जाणार आहे.
जिल्हा परिषदेचे प्रशासक आयुष प्रसाद यांनी 14 नोव्हेंबर रोजी खाते प्रमुखांची साप्ताहिक बैठक बोलावली होती.

या बैठकीला पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शिवाजी विधाटे, प्राथमिक विभागाच्या शिक्षण अधिकारी संध्या गायकवाड, माध्यमिक आणि निरंतर विभागाच्या शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे, कार्यकारी अभियंता युवराज देसाई, प्रदीप माने, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश खताळ, जिल्हा कृषी अधिकारी अनिल देशमुख, सहायक गटविकास अधिकारी आणि मनरेगा विभागाच्या स्नेहा देव या वेळेवर उपस्थित नव्हत्या.

बैठकीस वेळेवर उपस्थित न राहिल्याबद्दल या अधिकार्‍यांना आयुष प्रसाद यांनी नोटीस काढण्याचा आदेश सामान्य प्रशासन विभागाला दिला, तसेच यापुढे साप्ताहिक आढावा बैठकीला वेळेवर उपस्थित राहावे, अशी तंबी दिली. यातील काही अधिकारी वारंवार साप्ताहिक बैठक टाळतात. समर्पक कारणे न देता आढावा बैठकीला प्रतिनिधी पाठवतात. असे प्रकार वारंवार घडू लागल्याने प्रशासकांनी ही कारवाई केली.

Back to top button