पुणे; पुढारी वृत्तसेवा : महंमदवाडीतील विकास आराखड्यात आरक्षित असलेले दोन रस्ते आता पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) धर्तीवर डेव्हलपमेंट क्रेडिट नोटच्या मोबदल्यात विकसित करण्यात येणार आहेत. यासंबंधीचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीच्या मंजुरीसाठी पुढे ठेवला आहे. विकास आराखड्यातील अनेक रस्ते अद्यापही कागदावरच आहेत.
प्रामुख्याने रस्त्यांचे भूसंपादन आणि त्यासाठी द्यावा लागणारा मोबदला, त्यामुळे रस्ते विकसित करण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे प्रशासनाने आता पीपीच्या धर्तीवर क्रेडिट नोटच्या माध्यमातून विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात आता महंमदवाडी येथील सर्व्हे न. 26, 27, 37 मधील 24 मीटर डीपी रस्ता आणि त्यावर कल्व्हर्ट बांधणे तसेच स. नं. 38, 40, 41, 55, 56 मधील 30 मीटरचा डीपी रस्ता विकसित करण्यात येणार आहे.
त्यासाठी 26 कोटी 30 लाख 90 हजार खर्च येणार आहे. शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि शहराध्यक्ष नाना भानगिरे यांनी हे रस्ते विकसित करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महापालिका आयुक्तांकडे पाठपुरावा केला होता. त्यामुळे प्रशासनाने हे रस्ते आता पीपीपीतून विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. हे रस्ते विकसित झाल्याने महंमदवाडी परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे भानगिरे यांनी सांगितले.