हडपसर परिसरात मजुराचा खून; मध्यप्रदेशातील तरुणावर गुन्हा दाखल | पुढारी

हडपसर परिसरात मजुराचा खून; मध्यप्रदेशातील तरुणावर गुन्हा दाखल

पुणे; पुढारी वृत्तसेवा : एकत्र ठिकाणी काम करणार्‍या एका मजुराने दुसर्‍या मजुराचे गुप्तांग कापून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अरुण किसन सूर्यवंशी (वय 54, रा. शेवाळवाडी बसथांब्याशेजारी मांजरी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पिताराम केवट (वय 23, रा. शेवाळवाडी बसथांबाशेजारी मांजरी, मूळ. मध्यप्रदेश) याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. केवट हा सध्या खोली सोडून सर्व सामान घेऊन फरार झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

ही घटना 15 ते 17 नोव्हेंबर या कालावधीत घडली आहे. याबाबत लक्ष्मण अरुण सूर्यवंशी (वय 25) यांनी फिर्याद दिली आहे. दरम्यान, नेमका हा खून कोणत्या कारणातून झाला, हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. आरोपी पिताराम आणि अरुण सूर्यवंशी हे शेजारी असून, एकाच नर्सरीत कामाला होते. मंगळवारी (दि.15) सायंकाळी सात वाजता कामावरून घरी आल्यानंतर पिताराम आणि अरुण हे दोघे दारू पिण्यासाठी गेले होते. मात्र रात्री पिताराम हा एकटाच घरी परत आला. त्यामुळे अरुण यांच्या घरच्यांना संशय आला.

त्याच रात्री तो सहकुटुंब पसार झाला. त्यामुळे अरुण यांच्या घरच्यांचा आणखी त्याच्यावर संशय वाढला. त्यांनी अरुण बेपत्ता असल्याची तक्रार हडपसर पोलिसांकडे दिली. एकंदर त्यांनी दिलेली माहिती आणि घटनेचे गांभीर्य पाहता, पोलिसांनी तत्काळ तपासाला सुरुवात केली. दरम्यान मांजरीतील ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राच्या मोकळ्या जागेतील झाडीत अरुण यांचा त्यांचा मृतदेह सापडला. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद गोकुळे, गुन्हे निरीक्षक दिगंबर शिंदे, विश्वास डगळे यांनी घटनास्थळी भेट दिली.

खुनी व मयत व्यक्ती हे दोघे शेजारी-शेजारी राहण्यास असून, एकाच ठिकाणी काम करतात. पोलिसांनी तपास सुरू केला असून, फरार आरोपीचा शोध सुरू आहे. त्याला ताब्यात घेतल्यानंतरच नेमका खून कोणत्या कारणातून करण्यात आला हे स्पष्ट होईल.

                                       – अरविंद गोकुळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक

Back to top button