पुणे : सावरकरांवरील राहुल गांधींच्या टीकेमुळे शिवसेनेत अस्वस्थता | पुढारी

पुणे : सावरकरांवरील राहुल गांधींच्या टीकेमुळे शिवसेनेत अस्वस्थता

पुणे; ज्ञानेश्वर बिजले : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी टीका केली. त्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढविला. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या मुद्द्यावरून काँग्रेस व शिवसेनेतील मतभेदांमुळे महाविकास आघाडीला तडा जाणार की काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

गांधी यांनी टीका केल्यानंतर महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हा घटक पक्ष अडचणीत आला आहे. त्या पक्षाचे अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गांधी यांच्या विधानाशी असहमती दर्शविली. मात्र, भाजपवरही टीका केली. अशाप्रकारांमुळे आघाडीला तडा जाऊ शकतो, असा इशारा पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी दिल्याने आघाडीतही नव्याने तणाव निर्माण झाला आहे.

दुसर्‍या बाजूला काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी राऊत यांच्याशी संपर्क साधला. आघाडी ही समान कार्यक्रमाच्या मुद्द्यावर झाल्यामुळे ती तशीच सुरू राहील, असा खुलासा त्यांनी केला. आक्रमक विरोधकांमुळे या दोन्ही पक्षांच्या प्रवक्त्यांना बचावात्मक पवित्रा घ्यावा लागल्याचे शुक्रवारी दिसून आले.

अशी राजकीय स्थिती असताना सावरकर यांच्यावर झालेली टीका काँग्रेसच्या धोरणांशी सुसंगत असली, तरी ठाकरे गटाच्या द़ृष्टीने अडचणीची ठरली आहे. गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दहा दिवसांपूर्वी आली. शेगाव येथे मोठी जाहीर सभा होण्यापूर्वी गांधी यांनी सावरकर यांच्यावर टीका करीत, यात्रा रोखून दाखवावी, असे थेट आव्हान राज्य सरकारला दिले.

त्यावर कारवाई करून अनावश्यक महत्त्व देणार नसल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. मात्र, भाजपच्या व बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या नेत्यांनी आक्रमकपणे राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध केला. पुण्यात भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनासमोर आंदोलन केले. राज्यात ठिकठिकाणी निषेधार्थ आंदोलने झाली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शेगावला जाऊन आंदोलन करण्याची भूमिका घेतली. त्यांच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांना पोलिसांनी रस्त्यावर रोखत ताब्यात घेतले. राज्यभर उमटत असलेल्या पडसादामुळे राजकीय वातावरण ढवळून गेले आहे.

काँग्रेस, विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसशी झालेली आघाडी या मुद्द्यांवरच शिवसेना फुटली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत 40 आमदार भाजपसोबत गेले. हिंदुत्व हा मुद्दा महत्त्वाचा असल्याचा दावा या गटाने केला. त्यामुळे महाविकास आघाडी कायम ठेवण्यास शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाला अडचणीचे ठरते आहे. भाजपला विरोध हा मुद्दा सोडल्यास आघाडी कायम ठेवण्यासाठी अन्य ठोस मुद्दे त्यांच्याजवळ नाहीत.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर महाविकास आघाडी एकसंध ठेवण्याचे आव्हान आघाडीच्या नेत्यांसमोर आहे. अशावेळी सावरकर यांच्यावरील टीका, यासारखे मुद्दे पुढे आल्याने काँग्रेसमुळे घटकपक्ष अडचणीत येण्याची शक्यता आहे.

…तर बिघाडी अटळ
काँग्रेसची सध्याची वाटचाल ही 2024 ची निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून सुरू आहे. पुढील वर्षी काही राज्यांत भाजपविरुद्ध काँग्रेस यांच्यात थेट लढत रंगणार आहे. काँग्रेसमुळे यापुढेही आघाडीतील प्रादेशिक पक्षांची अडचण झाल्यास महाविकास आघाडीला तडा जाण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे पुण्यासारख्या काही ठिकाणी शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी यांचीच आघाडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

Back to top button