मंचर : दहशत निर्माण करणारी बिबट मादी जेरबंद | पुढारी

मंचर : दहशत निर्माण करणारी बिबट मादी जेरबंद

मंचर; पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्यातील मंचर-जुना चांडोली रस्ता परिसरात दहशत निर्माण करणारी बिबट मादी वन खात्याने शुक्रवारी (दि. 18) पहाटे जेरबंद केली आहे. बिबट्या पकडला गेल्याने स्थानिक नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. मात्र, या परिसरात आणखी एक-दोन बिबट्यांचा वावर असण्याची शक्यता नागरिकांनी वर्तविली आहे.

मंचर-जुना चांडोली रस्त्यावर दि. 27 ऑक्टोबरच्या रात्री 9 वाजेच्या सुमारास आपल्या पतीबरोबर दुचाकीवरून घरी चाललेल्या स्नेहा नवनाथ थोरात (वय 27, रा. चांडोली बुद्रुक, ता. आंबेगाव) या महिलेवर बिबट्याने हल्ला करीत तिला जखमी केले होते. या घटनेनंतर परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली होती. रात्री रस्त्यावरून जाण्यास नागरिक घाबरत होते.

या घटनेची दखल घेत मंचर वन विभागाचे वन परिमंडलाधिकारी संभाजीराव गायकवाड व पथकाने हल्ला झाल्यानंतर दोन दिवसांतच त्या ठिकाणी पिंजरा लावला होता. गेले काही दिवस पिंजरा लावूनही बिबट्या त्यामध्ये जेरबंद होत नव्हता. अखेर शुक्रवारी पहाटेच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाला. बिबट्या जेरबंद झाल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. जुना चांडोली रस्ता तसेच विकासवाडी परिसरात आणखी एक ते दोन बिबट्यांचा वावर असल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहेत. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, कोठे बिबट्या दिसून आल्यास वन विभागाला कळवावे, असे आवाहन एस. एल. गायकवाड यांनी केले आहे.

Back to top button