

पुणे : पुढारी वृत्तसेवा : गेल्या अडीच महिन्यांच्या कालावधीत पीएमपीच्या 38 चालकांना मारहाण झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे पीएमपीच्या वर्तुळात नाराजीचे वातावरण आहे. पीएमपीच्या ताफ्यात 2 हजार 142 बसगाड्या आहेत. त्याद्वारे पुणे, पिंपरीसह पीएमआरडीए भागात सेवा पुरविली जाते. त्याद्वारे 10 ते 12 लाख प्रवासी प्रवास करतात. मात्र, ही सेवा पुरविताना अलीकडच्या काळात पीएमपी चालकांना मारहाण करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.
1 जानेवारी ते 15 मार्च 2023 या कालावधीत 38 चालकांना मारहाण करण्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये काही प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर अनेक प्रकरणे जागीच मिटविण्यात आली आहे. मात्र, प्रत्येक घटनेची नोंद पीएमपीच्या अपघात विभागात करण्यात आली आहे.
पीएमपीच्या चालकांना मारहाण करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. प्रवासी सेवा पुरविताना अशाप्रकारे मारहाण होणे चुकीचे आहे. पीएमपी चालकांबाबत प्रवाशांनी आत्मीयता दाखवून वाद घालणे टाळावे. त्यासोबतच चालकांना मारहाण करणार्यांवर कडक कारवाई करण्यात यावी.
– हरिश ओव्हाळ, उपाध्यक्ष, पीएमपीएमएल, राष्ट्रवादी कामगार युनियन.आम्ही प्रवास करताना अनेक चालकांना पाहातो. कधी कधी प्रवासीदेखील चुकतात. मात्र, चुकी एकाच बाजूची कधीही नसते. त्यामुळे पीएमपीने आपल्या बेशिस्त चालकांना शिस्त लावावी आणि त्यांना प्रवाशांशी कसे वागावे याचे प्रशिक्षण द्यावे.
– दिनेश शिंदे, प्रवासी.