पिंपरी : ‘वायसीएम’ मध्ये परिचारिकांची ६७ पदे रिक्त | पुढारी

पिंपरी : 'वायसीएम' मध्ये परिचारिकांची ६७ पदे रिक्त

पिंपरी : महापालिकेच्या पिंपरी- संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) परिचारिकांची संख्या अपुरी आहे. रुग्णालयात सध्या कायमस्वरुपी तत्त्वावर, मानधन तत्त्वावर आणि कंत्राटदारामार्फत अशा तीन पद्धतीने सुमारे 421 परिचारिकांना कामावर घेण्यात आले आहे. मात्र, वाढती रुग्णसंख्या आणि रुग्णालयावरील अतिरिक्त ताण लक्षात घेता रिक्त 67 पदांवर परिचारिका घेणे गरजेचे आहे.

परिचारिकांना कायम करण्याची मागणी

वायसीएम रुग्णालयात मानधन तत्त्वावर कार्यरत असलेल्या 138 परिचारिकांना कायमस्वरुपी तत्त्वावर घेण्यात यावे, अशी संबंधित परिचारिकांची भूमिका आहे. त्यांनी यासाठी सुरुवातीला औद्योगिक न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर या विषयावर राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या माध्यमातून उच्च न्यायालयात अपील करण्यात आले. मानधन तत्त्वावरील परिचारिकांबाबत निर्णय लागत नाही, तोपर्यंत परिचारिकांची नियमित तत्त्वावर पदभरती करण्यात यावी, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. दरम्यान, उच्च न्यायालयाने हा विषय आता पुन्हा औद्योगिक न्यायालयाकडे पुढील कार्यवाहीसाठी वर्ग केला आहे.

159 परिचारिकांची नियुक्ती

वायसीएम रुग्णालय हे महापालिकेचे मध्यवर्ती रुग्णालय आहे. या रुग्णालयात पिंपरी-चिंचवड शहराबरोबरच शहराबाहेरील रुग्णदेखील उपचारासाठी येत असतात. रुग्णालयात कायमस्वरुपी तत्त्वावर 208 परिचारिकांच्या पद भरतीला मंजुरी आहे. त्यापैकी सध्या 159 जागांवर परिचारिकांची नियुक्ती केलेली आहे. मात्र, 49 पदे अद्याप रिक्त आहेत. मानधनतत्त्वावर 156 पदे मंजूर असून, त्यापकी 138 पदांवर परिचारिकांची नियुक्ती केलेली आहे. तर, 18 पदे रिक्त आहेत. कंत्राटी तत्त्वावर परिचारिकांची 124 पदे मंजूर असून, ती सर्व भरलेली आहेत.

परिचारिकांच्या 67 रिक्त जागा भरल्यानंतर रुग्णालयामध्ये सर्जरी विभागासाठी आणखी एक वॉर्ड सुरू करता येईल. तसेच, त्वचा, उरोरोग आदीच्या रुग्णांसाठीदेखील एक वॉर्ड सुरू करता येणार आहे. त्याशिवाय, रुग्णालयातील अतिदक्षता विभाग आणि बालकांचा अतिदक्षता विभाग यासाठी खाटांची संख्या वाढविता येईल. सध्या परिचारिकांच्या कमतरतेमुळे त्यामध्ये अडचणी येत आहेत
                                                – डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता, वायसीएम

Back to top button