चांदणी चौकात अडथळ्यांची शर्यत; बसथांबा नसल्याने प्रवाशांची गैरसोय | पुढारी

चांदणी चौकात अडथळ्यांची शर्यत; बसथांबा नसल्याने प्रवाशांची गैरसोय

बावधन; पुढारी वृत्तसेवा : चांदणी चौकामध्ये प्रवाशांना जीव धोक्यात घालून जिथे जागा मिळेल तिथे बसची वाट पाहात उभे राहावे लागत आहे. पुण्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळख असलेल्या या चौकामध्ये सध्या नागरिक व प्रवाशांना विविध असुविधांचा सामना करावा लागत आहे. चांदणी चौकात सध्या सुमारे 200 कोटी रुपयांचे बजेट असलेल्या पुलाचे काम सुरू आहे.

मुळशीकडे जाणार्‍या प्रवाशांना रस्त्याच्या बाजूला बांधलेल्या साईड गटारीवर उभे राहून जीव धोक्यात घालून वाहनांची वाट पहावी लागत आहे. या ठिकाणी ठेवलेल्या वायर गुंडाळण्याच्या रोलरखाली महिला उभ्या राहून उन्हापासून स्वतःचे संरक्षण करत वाहनांची वाट पाहात थांबत असल्याचे चित्र दिसून येत आहे. पुण्याकडून मुंबईकडे जाणारे प्रवासीसुद्धा जीव धोक्यात घालून महामार्गावरच उभे असतात. अनेकदा अपघातसुद्धा झालेले आहेत

. त्याचप्रमाणे चांदणी चौकातून कोथरूडकडे आणि वारजेकडे जाणार्‍या प्रवाशांची संख्यासुद्धा मोठी असल्याने ते सुद्धा स्वतःचा जीव धोक्यात घालून महामार्गावरच थांबलेले असतात. काम सुरू असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात धूळ पसरली आहे. यामुळे त्या ठिकाणी उभ्या राहणार्‍या प्रवाशांना त्याचा त्रास होत आहे. चांदणी चौकात ज्या ठिकाणी प्रवासी उभे राहतात, त्या ठिकाणी रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत प्रवाशांसाठी तात्पुर्ते शेड उभारण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.

महिलांची स्वच्छतगृहाअभावी कुचंबना
पिरंगुटकडे येणार्‍या प्रवाशांची संख्या सकाळी मोठी असते. यात कामगार, विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. अनेक प्रवासी हे रस्त्यावरच उभे असतात. त्यामुळे वाहतूक कोंडीसुद्धा होत असते. या परिसरात असलेले पूर्वीचे महिलांचे शौचालय तोडण्यात आले आहे, यामुळे महिलांची मोठी गैरसोय होत आहे.

Back to top button