बिबवेवाडीतील ‘ती’ भिंत पाडली; रुंदीकरणाचा मार्ग झाला मोकळा | पुढारी

बिबवेवाडीतील ‘ती’ भिंत पाडली; रुंदीकरणाचा मार्ग झाला मोकळा

बिबवेवाडी; पुढारी वृत्तसेवा : एका खासगी मालकाच्या या बांधकामामुळे रस्त्याचे रुंदीकरण गेले दहा वर्षांपासून रखडलेले होते. याबाबत न्यायालयीन प्रक्रिया बरेच वर्षे चालली. या रस्त्यामधील भिंतीचे बांधकाम भूसंपादन विभाग व बांधकाम विभागाने नुकतेच काढले. यामुळे खिंडीतील रस्त्यावरील वाहतूक कोंडीची समस्या सुटणार आहे. गंगाधाम चौक ते आई माता मंदिर रस्त्यावरील ही भिंत काढल्यामुळे या रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे.

भूसंपादन विभागाचे उपअभियंता जयवंत पवार, शाखा अभियंता, संतोष शिंदे, रूपाली ढगे, बांधकाम विभागाचे शाखा अभियंता उमेश सुद्रिक, पथ विभागाचे कनिष्ठ अभियंता तुळशीदास भंडारकोठे आदी या वेळी उपस्थित होते. पोलिसांनी या ठिकाणी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवल्याचे चित्र या वेळी दिसून आले. दरम्यान, ही कारवाई सुरू झाल्यामुळे या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

या रस्त्यावरील रुंदीकरणाचा प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित होता. खासगी जागामालक व महापालिका यांच्यात याबाबतचा दावा न्यायालयात सुरू होता. न्यायालयीन दावा, प्रतिदाव्यानंतर या रस्त्यातील अतिक्रमणे काढण्यात आले.

                  प्रतिभा पाटील, उपायुक्त, भूसंपादन व व्यवस्थापन, महापालिका.

Back to top button