भवानीनगर : संचालकांनी साखर आणि मळी विक्रीचा घेतलेला निर्णय योग्यच | पुढारी

भवानीनगर : संचालकांनी साखर आणि मळी विक्रीचा घेतलेला निर्णय योग्यच

भवानीनगर; पुढारी वृत्तसेवा : श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे साखर व मळी विक्रीबाबत केलेले आरोप हे वस्तुस्थितीचा विपर्यास करणारे असून, त्या-त्या वेळच्या प्राप्त परिस्थितीचा विचार करून साखर व मळी विक्रीबाबत संचालक मंडळाने घेतलेला निर्णय योग्यच आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे यांनी दिली.

या वर्षीचा गळीत हंगाम सुरू करण्यापूर्वी मशिनरी ओव्हरहॉलिंग व मेन्टेनन्सची कामे, ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा भरती करणे, केमिकल, बारदाना खरेदी, कर्मचार्‍यांचे पगार इत्यादींसाठी जवळपास 47 कोटी रुपयांची आवश्यकता होती. त्याकरिता संचालक मंडळाने बँकांकडून रक्कम उपलब्ध करणेसाठी प्रयत्न केला व जिल्हा बँकेनेसुद्धा कारखान्यास जेवढी मदत करता येईल तेवढी मदत केली आहे.

परंतु, रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधामुळे बँकेकडून एवढी मोठी रक्कम विनातारण उपलब्ध होऊ शकत नसल्याने संचालक मंडळाने मळी व साखर आगाऊ विक्री करण्याचा निर्णय घेतला. गेली 2 ते 3 महिन्यांपासून कारखाना ही रक्कम बिनव्याजी वापरत आहे. यामध्ये कारखान्याचा फायदाच झाला आहे. ही रक्कम बँकेकडून घेतली असती, तर त्याकरिता 12 टक्के व्याज भरावे लागले असते व साखर व मळी विक्रीबाबतचा निर्णय घेतला नसता, तर कारखान्याचा गळीत हंगाम चालू करणे अडचणीचे झाले असते.

मागील दोन हंगामातही आपण तशा पद्धतीचे निर्णय घेतले. यामुळे आपल्याला गळीत हंगाम घेता आले व उच्चांकी गाळप करता आले. साखर व मळीचे आता बाजारभाव वाढले असून, साखर व मळीच्या आगाऊ विक्री केल्यामुळे कारखान्यास तोटा आला, असा आरोप करण्यात आला आहे. शेवटी बाजारपेठेत चढ-उतार होत असतो. पाठीमागे जाचक हे संचालक मंडळाचे सभेस उपस्थित राहत होते.

त्या वेळी हंगाम चालू करण्याच्या दृष्टीने कारखान्यास पैशाची आवश्यकता होती व बँकेकडून पैसे उपलब्ध होत नसल्याने जाचक यांच्या संमतीने मळीची आगाऊ विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या वेळी त्यांनी कारखान्यास पैशाची उपलब्धता होत नसेल, तर जेवढ्या पैशाची आवश्यकता आहे तेवढ्या प्रमाणात मळीची आगाऊ विक्री करावी, असे सूचित केले होते. तसेच, साखरेचे दर वाढल्याचे कारण देऊन काही साखर कारखान्यांनी साखर विक्रीचे करार मोडले असले. त्या कारखान्यांनी प्रतिक्विंटल रुपये 100/- प्रमाणे ई. एम. डी. घेऊन करार केले आहेत. परंतु आपल्या कारखान्याने प्रतिक्विंटल रुपये 1,100/- प्रमाणे ई. एम. डी. घेतली आहे, असे अध्यक्ष प्रशांत काटे यांनी सांगितले.

Back to top button