भवानीनगर : मळी, साखरेच्या आगाऊ विक्रीमुळे ‘छत्रपती’ला सोळा कोटींचा तोटा | पुढारी

भवानीनगर : मळी, साखरेच्या आगाऊ विक्रीमुळे ‘छत्रपती’ला सोळा कोटींचा तोटा

भवानीनगर; पुढारी वृत्तसेवा : सध्या साखर व मळीचे दर वाढले असून, श्री छत्रपती कारखान्याचे संचालक मंडळ या वर्षीच्या गाळप हंगामामध्ये उत्पादित होणारी मळी व साखर कमी दरात आगाऊ विक्री करून अजब काटकसरी कारभार करीत आहे. यामुळे कारखान्याला तब्बल 16 कोटी 10 लाख रुपयांचा तोटा झालेला आहे, असा आरोप साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी केला. याबाबत जाचक म्हणाले, की कारखान्याकडे पैसे उपलब्ध नसल्यास जिल्हा बँकेकडून खास बाब म्हणून खासगी कारखान्याप्रमाणे विनातारण कर्ज मंजूर करून घेतले असते, तर ते निश्चितच कारखान्याच्या हिताचे झाले असते.

श्री छत्रपती कारखान्याच्या संचालक मंडळाने दोन महिन्यापूर्वी कच्ची साखर 3 हजार 275 रुपये प्रतिक्विंटल व पक्की साखर 3 हजार 310 प्रतिक्विंटल आणि मळी 6 हजार 250 रुपये प्रतिटनाप्रमाणे आगाऊ विक्री केली आहे. गेली दोन वर्षे हा आगाऊ विक्रीचा प्रकार चालू आहे. कारखान्याचा हंगाम चालू होण्यापूर्वी बाजारपेठेचा अभ्यास न करता मळी, साखर आगाऊ विकल्यास तोटा होतो. हे वारंवार सांगून संचालक मंडळाने दुर्लक्ष केले आहे.

आज कच्च्या साखरेचे प्रतिक्विंटल दर 3 हजार 720 असून, कच्ची साखर 3 हजार 275 रुपये प्रतिक्विंटलने विकली आहे. म्हणजे प्रतिक्विंटल 445 रुपये कमी मिळाले आहेत. एक लाख पोत्यामागे 4 कोटी 45 लाख रुपये कमी मिळाले आहेत. आज पक्क्या साखरेचे दर 3 हजार 775 रुपये असून, 3 हजार 310 रुपये प्रतिक्विंटलने विकली आहे. यामध्ये प्रतिक्विंटल 465 रुपये कमी मिळाले आहेत. म्हणजे एक लाख पोत्यामागे 4 कोटी 65 लाख रुपये कमी मिळाले आहेत.

आज मळीचे दर प्रतिटन 8 हजार रुपये असून, संचालक मंडळाने 6 हजार 250 रुपये प्रतिटनाने 40 हजार मेट्रिक टन मळीची आगाऊ विक्री केलेली आहे. मळीच्या दरात इथेनॉलचे दर वाढल्यामुळे आणखी वाढ होणार आहे. प्रतिमेट्रिक टन मळी विक्रीमध्ये 1 हजार 750 रुपये कमी मिळाले आहेत. म्हणजे 40 हजार मेट्रिक टनामागे 7 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. सर्व मिळून असा मिळून 16 कोटी 10 लाख रुपयांचा तोटा झालेला आहे, आता ही जबाबदारी कोणाची आहे, असा सवाल जाचक यांनी केला आहे.

Back to top button