मंचर येथील तीन बिबट्यांचा व्हिडिओ फेक | पुढारी

मंचर येथील तीन बिबट्यांचा व्हिडिओ फेक

मंचर; पुढारी वृत्तसेवा : मंचर शहरातील जुन्या महात्मा गांधी विद्यालयाकडे जाणार्‍या बेंडेमळा वस्तीवर तीन बिबटे आढळल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मात्र, वनविभागाच्या अधिकार्‍यांना या व्हिडिओबाबत शंका आल्याने त्यांनी या व्हिडिओची खातरजमा केली असता, तो फेक असून दुसर्‍याच ठिकाणचा असल्याचे समोर आले आहे. मात्र, बेंडे मळा परिसरात लहान बछड्याचा असलेला व्हिडिओ हा खरा असून, या परिसरात बिबट मादीचा वावर असल्याचे वनविभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले आहे.

बेंडेमळा, स्वामी समर्थ व मुंजाबा मंदिर परिसरात तीन बिबट एकापाठोपाठ रस्ता पार करीत असतानाचा बिबट्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हे बिबट झुडपातून बाहेर येत असताना दिसत होते. व्हिडिओ व्हायरल होताच या परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. याबाबत वनविभागाच्या अधिकार्‍यांनी तत्काळ दखल घेत परिसरात पाहणी करीत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले होते. तसेच या रस्त्यावरून महात्मा गांधी विद्यालय येथे जाणार्‍या विद्यार्थ्यांनाही सतर्क राहण्याचा इशारा दिला होता.

मात्र, व्हायरल झालेल्या व्हिडिओ व बेंडेमळा येथील ठिकाण मिळते जुळते नसल्याने या व्हिडिओबाबत शंका उपस्थित झाल्याने मंचर येथील वनपरिमंडळ अधिकारी संभाजीराव गायकवाड यांनी या व्हिडिओबाबत खातरजमा केली. संबंधित व्हिडिओ व्हायरल करणार्‍या तरुणास बोलावून त्याला आपल्या गाडीत बसवून तू व्हिडिओ शूटिंग कोठे काढले ते ठिकाण दाखवण्यास सांगितले असता, त्या तरुणाने हा व्हिडिओ मला दुसरीकडून आला असल्याचे सांगितले. व्हिडिओतील ठिकाण व बेंडेमळा येथील ठिकाण मिळतेजुळते नसल्याने तो व्हिडिओ दुसर्‍याच ठिकाणचा असून तो जॉइण्ड करून व्हायरल करण्यात आला असल्याचे गायकवाड यांनी सांगितले आहे. मात्र, याच परिसरात लहान बछडा असल्याचा एक व्हिडिओ हा खरा असून, या परिसरात बिबट मादीचा वावर असल्याची शक्यता वन विभागाच्या वतीने वर्तविण्यात आली आहे.

Back to top button