जेजुरी-धालेवाडी सोमवती पालखी मार्गाची दुरवस्था | पुढारी

जेजुरी-धालेवाडी सोमवती पालखी मार्गाची दुरवस्था

जेजुरी; पुढारी वृत्तसेवा : कुलदैवत श्री खंडोबाच्या सोमवती यात्रा पालखी मार्ग जेजुरी ते धालेवाडी जाणार्‍या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. नगरपालिका प्रशासन व जिल्हा परिषद प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. जेजुरी-धालेवाडी रस्त्याने वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. कोथळे, रानमळा, भोसलेवाडी, बुधे मळा, पिसर्वे आदी गावांतून या रस्त्याने मोठ्या प्रमाणात लोक ये-जा करतात. शेतकर्‍यांच्या उसाचे ट्रक, ट्रॅक्टर, पाण्याचे टँकर आदी वाहनांची वर्दळ असते. वर्षातून दोन-तीन वेळा सोमवती यात्रा भरते. या वेळी शेकडो वाहने व दररोजची वाहनांतून कर्‍हा नदीवर धार्मिक विधीसाठी भाविक येतात. अशा वेळी वाहनधारकांना रस्त्यावर अक्षरशः कसरत करावी लागते.

अनेक वर्षे हा रस्ता दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. जेजुरी नगरपालिका आणि जिल्हा परिषद हा रस्ता या आपल्या हद्दीत नसल्याचे सांगते. हद्दीच्या वादात सर्वसामान्य शेतकर्‍यांनी कोणाकडे दाद मागावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कोथळे, धालेवाडी, रानमळा,
भोसलेवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात ऊसलागवड असून, ऊस तोडणीनंतर या रस्त्यानेच ट्रक, ट्रॅक्टरने वाहतूक केली जाणार आहे.

अशा वेळी रस्त्याच्या दुरवस्थेमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक वेळा या खड्डे पडलेल्या रस्त्यावर ऊस घेऊन जाणारी वाहने पलटी झाली आहेत.आमदार, नगरपालिका व जिल्हा परिषद यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन हा रस्ता ताबडतोब दुरुस्त करावा, अशी मागणी परिसरातील नागरिक व भाविकांनी केली आहे.

Back to top button