पुणे; पुढारी वृत्तसेवा : सध्या मुंबईत गोवर आजाराचा उद्रेक दिसतो आहे. राज्यात गेल्या 4 वर्षांमध्ये 941 रुग्णांमध्ये गोवरचे निदान झाले. त्या पार्श्वभूमीवर लसीकरण राहिलेल्या बालकांसाठी अभियान स्वरुपात विशेष लसीकरण सत्रे घेण्यात येत आहेत. पुण्यात मात्र चार वर्षांत गोवरचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही.
राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे गोवर-रुबेला लसीचा डोस चुकलेल्या 9 महिने ते 5 वर्षे वयोगटातील बालकांची जिल्हा / मनपा क्षेत्रनिहाय यादी करण्यात आली आहे. या बालकांसाठी विशेष तसेच नियमित सत्रांमध्ये लसीकरण करण्यात येत आहे. गेल्या तीन आठवड्यांमध्ये राज्यात 2974 विशेष लसीकरण सत्रांचे आयोजन करण्यात आले. त्याचप्रमाणे घरोघरी जाऊन गोवर रुग्णांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे.
मुंबईतील स्थिती
या वर्षी राज्यात गोवरचे 26 उद्रेक झाले आहे. मुंबईत 14, भिवंडी येथे 7 तर मालेगाव मनपा येथे 5 असे झाले आहेत. मुंबईमधील 8 वॉर्डस हे सर्वाधिक गोवर प्रभावित असून एम इस्ट वॉर्ड मध्ये सर्वाधिक म्हणजे 5 उद्रेक झाले आहेत तर 3 उद्रेक एल वॉर्डमध्ये झाले आहेत. मुंबईत 8 संशयित गोवर रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यातील 7 रुग्ण एम इस्ट वॉड रुग्ण एल वॉर्ड मधील आहे. यातील फक्त एका बालकाने गोवरचा एक डोस घेतला आहे. उर्वरित बालकांनी गोवर प्रतिबंधक लस घेतलेली नाही
मुंबईमधील गोवर परिस्थिती
उद्रेक 14
संशयित रुग्ण 1259
निश्चित निदान झालेले रुग्ण 164
संशयित गोवर मृत्यू 8
मुख्यमंत्र्यांद्वारे गोवर परिस्थितीचा आढावा
रुग्णांची देखभाल काळजीपूर्वक करण्यात यावी. याबाबत मुख्यमंत्र्यांनी सर्व संबधितांना सूचना दिल्या. गोवर रुग्ण सर्वेक्षण अधिक सक्षम करण्याच्या तसेच जी मुले लसीकरणापासून वंचित राहिलेली आहेत. त्यांच्या लसीकरणासाठी अधिकाधिक प्रयत्न करण्याचे निर्देश दिले. जनमानसात लसीकरणाबाबतीत असलेले गैरसमज दूर करण्यासाठी व्यापक प्रमाणावर लोकप्रबोधन करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
'गोवर लसीकरण मोहिमेस सहकार्य करा'
मुंबईमध्ये सध्या सुरू असणा-या गोवर उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर सर्व जनतेने आपल्या कुटुंबातील 9 महिने ते 5 वर्षे वयोगटातील मुलांची गोवर लस राहिली असल्यास ती तातडीने घ्यावी. आपल्या परिसरातील मुलांनीही ती घ्यावी यासाठी आवश्यक प्रयत्न करावेत. गोवर हे लहान मुलांमधील प्रतिकार शक्ती कमी होणे, अतिसार, न्यूमोनिया अशा गंभीर आजारांचे प्रमुख कारण आहे, हे लक्षात घेऊन सर्वांनी मोहिमेस सहकार्य करा, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात येत.