पुणे शहरात चोरटे झाले उदंड! जबरी चोरीच्या तीन घटना | पुढारी

पुणे शहरात चोरटे झाले उदंड! जबरी चोरीच्या तीन घटना

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शहरात शंकरशेठ रोड, कोथरूड तसेच हडपसर येथील गोंधळेनगर येथे जबरी चोरीच्या तीन घटना घडल्या असून, फुरसुंगी येथे सहा लाख 62 हजारांची घरफोडी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात जबरी चोरी तसेच घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शंकरशेठ रस्त्यावरील हिरो शोरूममध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करणार्‍या धीरज विश्वकर्मा (वय 23, रा. स्नेहगंगा सोसायटी, कंपाउंड, शंकरशेठ रोड, स्वारगेट) यांना पत्ता विचारण्याचा बहाणा करत चोरट्यांनी त्यांच्याकडील मोबाईल आणि रोकड चोरून नेली. याप्रकरणी धीरज यांनी दिलेल्या फिर्यादीवरून स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाईलवर बोलत रिक्षाची वाट पाहणार्‍या महिलेच्या हातातील मोबाईल दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी चोरून नेला. याबाबत संजना संगीत चंगेडिया (24, रा. उन्नत्ती बिल्डींग, चौथा मजला, प्रभात रोड) यांनी अलंकार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचा 20 हजारांचा तर अनंत नरके या व्यक्तीचा 8 हजार रुपयांचा मोबाईल या वेळी चोरून नेण्यात आला.

तर रिक्षात बसून तुकाई दर्शन येथील आपल्या घरी निघालेल्या गणेश जालिंदर पाटील (30) या तरुणाला रिक्षात अगोदरच बसलेल्या तिघांनी थंडी वाजत असल्याने कपडे घालण्यास सांगून झटापट केली. त्यावर गणेश यांनी रिक्षा बाजूला घेण्यास सांगितल्यानंतर आरोपींनी गणेश यांचा लॅपटॉप आणि रोख रक्कम चोरून नेली.

याप्रकरणी चौघांना हडपसर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अनिकेत ऊर्फ गोट्या दत्तात्रय पवार, अक्षय अनिल पवार, तौफिक युसूफ पठाण, अभिलाष बिरजू कदम (सर्व रा. हडपसर) यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत गणेश यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा सर्व प्रकार हडपसर गोंधळेनगर येथील बेकर्स झोनजवळ घडला.

Back to top button