पुणे : सव्वा लाखाचे दागिने लंपास करून चोरटा फरारी | पुढारी

पुणे : सव्वा लाखाचे दागिने लंपास करून चोरटा फरारी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : एका भाजी विक्रेत्या महिलेला अडीच किलो सोन्याचे प्रलोभन चांगलेच महागात पडले आहे. सोने तर मिळालेच नाही, मात्र सव्वा लाख रुपये किमतीचे साडेतीन तोळ्याचे गंठण गमाविण्याची वेळ आली. ही घटना बुधवारी (दि.16) सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास वारजे- माळवाडी परिसरात घडली. याप्रकरणी अगळंबे येथील एका महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार वारजे-माळवाडी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेकडे एक अनोळखी व्यक्ती गेली. त्याने महिलेचा विश्वास संपादन केला. तो त्या महिलेच्या पतीला ओळखत असून, त्यांना ऑफर लागली असल्याचे सांगितले. त्या ऑफरअंतर्गत त्यांना अडीच किलो सोने व पैसे मिळणार आहेत. मात्र, त्यासाठी तुमच्या गळ्यातील सोन्याच्या गंठणाचे अगोदर वजन करावे लागेल, असे सांगितले. फिर्यादी महिला त्याने सांगितल्याप्रमाणे त्याच्याच दुचाकीवर बसून गंठण वजन करण्यासाठी गेली. चोरट्याने त्यांच्या गळ्यातील गंठण काढून घेतले. शेजारील दुकानातून वजन करून येतो, असे सांगून पळ काढला. वाट पाहूनदेखील गंठण घेऊन जाणारा आला नाही, त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

प्रलोभनाला बळी पडू नका…
एकाला मुलगा झाला असून, साड्या व पैसे वाटपाचा कार्यक्रम ठेवला आहे. तुमच्या मुलाला, पतीला ऑफर मिळाली असून, त्यांना दुचाकी किंवा दोन-अडीच किलो सोने मिळणार आहे, असे जर कोणी तुम्हाला सांगून बोलण्यात गुंतवित असेल किंवा प्रलोभन दाखवत असेल, तर वेळीच सावध व्हा. गेल्या काही दिवसांपासून शहरात अशा घटना वाढल्या आहेत. प्रामुख्याने ज्येष्ठांना या चोरट्यांकडून टार्गेट केले जाते. आज या परिसरात, तर उद्या दुसर्‍या परिसरात ही टोळी डल्ला मारते आहे. त्यामुळे कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Back to top button