पुणे : जिल्हा परिषदेतील वॉररूम कार्यान्वित; आपत्कालीन काळात उपयोगी | पुढारी

पुणे : जिल्हा परिषदेतील वॉररूम कार्यान्वित; आपत्कालीन काळात उपयोगी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेत मंत्रालयातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कार्यालयातील वॉररूम आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिटच्या धर्तीवर केलेली वॉररूम कार्यान्वित करण्यात आली आहे. या वॉररूममुळे कामामध्ये सुसूत्रता येणार असून, प्रत्येक कामाचे मॉनिटरिंग होणार आहे,अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

या वॉररूमला विकास योजना निरीक्षण कक्ष असे नाव देण्यात आले आहे. येथून जिल्ह्यात राबविण्यात येणार्‍या विविध योजना तसेच आपत्कालीन परिस्थितीत उद्भवणार्‍या परिस्थितीत नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. तसेच, पंचायत समितीच्या कार्यालयीन कामकाजामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी कोणत्या कामाची फाईल किती दिवस कोणाकडे आहे? याची माहिती अद्ययावत करण्यात येणार आहे.

त्यामुळे विनाकारण फाईल थांबविल्यास खुलासा द्यावा लागणार आहे. विशेषत: नागरिकांना आपल्या गावातील तक्रारी मांडण्यासाठी जिल्हा परिषदेत यावे लागत होते किंवा तक्रार निवारण दिवशीही संधी मिळायची. आता वॉररूमच्या माध्यमातून दररोज नागरिकांना त्यांच्या समस्या, तक्रारी मांडता येणार आहेत.

टोल फ्री कॉल सेंटर युनिटमध्ये ठेवल्याने तक्रार निवारणातही मदत होईल. भविष्यात या युनिटची घनकचरा आणि गाळ व्यवस्थापन म्हणून जिल्हा परिषदेने विस्तारित केलेल्या सेवांना मदत होईल. त्याचबरोबर कोविड रुग्णांसाठी बेड व्यवस्थापन, अँटिलम्पी लसीकरणाचे निरीक्षण इत्यादी आपत्ती व्यवस्थापनात देखील मदत होत आहे. डेटा व्यवस्थापन आणि वेळेत समन्वय साधण्यास या कक्षामुळे मदत होणार आहे.

कामांना गती देण्यासाठी उपयोगी…
मुख्यालय आणि पंचायत समिती यांच्यातील अधिकार्‍यांमध्ये संवाद साधून कामांना गती देण्यात येणार आहे. प्रत्येक गोष्टीची नोंद घेतल्यामुळे वारंवार सांगण्याची आवश्यकता नाही. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून दिलेल्या सूचना, त्यावर झालेली कार्यवाही, आलेला अहवाल या सर्वांचे ट्रॅकिंग ठेवले जाणार आहे. त्यामुळे एकाच कामासाठी वारंवार आठवण करून देण्याची आवश्यकता नाही. हे वॉररूम अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू राहणार आहे, असेही प्रसाद यांनी सांगितले.

Back to top button