पुणे : बारावीसाठी साडेतेरा लाख अर्ज; दहावीसाठी पावणेबारा लाख अर्ज | पुढारी

पुणे : बारावीसाठी साडेतेरा लाख अर्ज; दहावीसाठी पावणेबारा लाख अर्ज

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कोरोना प्रादुर्भावाच्या दोन वर्षांनतर पुढील वर्षीची दहावी-बारावीची परीक्षा पारंपरिक पद्धतीने घेण्यात येणार आहे. दहावी-बारावी परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरूअसून, बारावीसाठी साडेतेरा लाख, तर दहावीसाठी पावणेबारा लाख विद्यार्थ्यांनी अर्ज भरल्याचे स्पष्ट झाले आहे. अर्ज भरण्यात मुंबई आणि पुणे विभागाने आघाडी घेतली असून, अर्ज भरणार्‍या विद्यार्थ्यांचा टक्का यंदा वाढणार असल्याचे दिसून येत आहे.

राज्य मंडळाने दहावी-बारावीचे संभाव्य वेळापत्रक अगोदरच जाहीर केले आहे. त्यानुसार बारावीची परीक्षा 21 फेब—ुवारी ते 20 मार्च 2023 दरम्यान घेण्यात येणार आहे. तर, दहावीची परीक्षा 2 ते 25 मार्चदरम्यान घेण्यात येणार आहे. हे जरी संभाव्य वेळापत्रक असले, तरी यात फारसा बदल होणार नसल्याचे दिसून येत आहे. बारावीसाठी आता नियमित शुल्क देऊन 25 नोव्हेंबर, तर विलंब शुल्क देऊन 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

शुल्क बँकेत भरण्यासाठी उच्च माध्यमिक शाळा, तसेच कनिष्ठ महाविद्यालयांना 2 डिसेंबरची मुदत देण्यात आली आहे. तर, विद्यार्थ्यांच्या याद्या तसेच प्रिलिस्ट जमा करण्यासाठी 7 डिसेंबरची मुदत देण्यात आली आहे. दहावीचे अर्ज भरण्यासाठी नियमित शुल्क देऊन 25 नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याची शक्यता आहे.

राज्य मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार, दहावी-बारावीची परीक्षा आता प्रचलित पद्धतीनेच घेण्यात येणार आहे. त्यामुळे गेल्या वर्षी देण्यात आलेल्या शाळा तिथे परीक्षा केंद्र, अभ्यासक्रमात 25 टक्के कपात आणि पेपर लिहिण्यासाठीचा वाढीव वेळ या सुविधा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी राज्य मंडळाने तयार केलेल्या पूर्वीच्या नियमांनुसारच विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागणार आहे.

बारावीसाठी तीन महिन्यांचा, तर दहावीसाठी साडेतीन महिन्यांचा कालावधी राहिल्यामुळे परीक्षेच्या तयारीला वेग येणार आहे. दहावी-बारावीचे अर्ज भरण्यास परीक्षा सुरू होण्याच्या काही दिवस अगोदरपर्यंत संधी देण्यात येणार असल्यामुळे अर्ज करणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या वाढणार असल्याची माहिती राज्य मंडळातील अधिकार्‍यांनी दिली.

बारावीसाठी विभागनिहाय अर्ज
पुणे – 2 लाख 32 हजार 356
नागपूर – 1 लाख 48 हजार 975
औरंगाबाद – 1 लाख 50 हजार 669
मुंबई – 3 लाख 10 हजार 975
कोल्हापूर – 1 लाख 16 हजार 433
अमरावती – 1 लाख 31 हजार 833
नाशिक – 1 लाख 49 हजार 432
लातूर – 85 हजार 385
कोकण – 25 हजार 715
एकूण अर्ज – 13 लाख
51 हजार 593
दहावीसाठी भरलेले अर्ज
पुणे – 2 लाख 7 हजार 993
नागपूर – 1 लाख 19 हजार 79
औरंगाबाद – 1 लाख 15 हजार 335
मुंबई – 2 लाख 69 हजार 968
कोल्हापूर – 1 लाख 3 हजार 860
अमरावती – 1 लाख 15 हजार 834
नाशिक – 1 लाख 46 हजार 373
लातूर – 74 हजार 536
कोकण – 22 हजार 984
एकूण अर्ज – 11 लाख
75 हजार 962

Back to top button