धक्कादायक ! आजोबा आणि वडिलांनीच केला अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शहरात नात्याला काळिमा फासणार्या संतापजनक घटना समोर आल्या आहेत. या तीनही घटनांमध्ये घरच्या, जवळच्या तसेच ओळखीच्या नातेवाईकांनी अल्पवयीन निर्भयांना आपल्या वासनेची शिकार केले आहे. येरवडा कारागृहात असलेल्या आई-वडिलांना भेटण्यासाठी पुण्यात आणून 14 वर्षांच्या निर्भयावर मावसकाकाने अत्याचार केले. तर दुसर्या घटनेत चुलता, आजोबा व वडिलांनीच 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. तिसर्या घटनेत 12 वर्षांच्या मुलीवर तिच्या ओळखीच्या व्यक्तीने लैंगिक अत्याचार केले. यात ती गर्भवती झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
उत्तर प्रदेशातील गावाकडे असताना चुलत्याने दमदाटी करून तिच्यावर वर्षभर अत्याचार केला. आजोबांनी देखील तिचा वारंवार विनयभंग करत लैंगिक अत्याचार केले. दरम्यान तिने ही बाब आपल्या वडिलांना चिठ्ठी लिहून सांगितली. तर वडिलांनीच बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासत तिच्यावर गेली 4 वर्षे अत्याचार केल्याचे समोर आले. पीडित सतरा वर्षीय निर्भया बारावीच्या वर्गात शिक्षण घेते.
कॉलेजमधील एका समुपदेशनाच्या कार्यक्रमात तिचा संयम सुटला अन् तिने समुपदेशकांना आपल्यावर गेल्या 6 वर्षांपासून होत असलेल्या अत्याचाराची आप-बिती सांगितली. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी तिच्या 49 वर्षांच्या नराधम बापाला अटक केली आहे, तर चुलता आणि आजोबा या दोघांवर बाललैंगिक अत्याचारविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हिचे आई-वडील पुण्यात मोलमजुरी करून राहतात. घरची परिस्थिती चांगली नसल्याने त्यांनी फिर्यादीला उत्तर प्रदेशातील आपल्या मूळ गावी राहायला पाठविले. 2016 ते 2018 या काळात ही मुलगी साधारण 12 -13 वर्षांची असताना मूळ गावी 33 वर्षांच्या चुलत्याने तिला दमदाटी करून जबरदस्तीने एक वर्षभर तिच्याबरोबर अत्याचार केले.
तर तिचे 70 वर्षांच्या आजोबाने देखील अत्याचार केले. त्यानंतर एप्रिल 2018 मध्ये ती पुण्यात आई-वडिलांकडे आली, तेव्हा तिने आपल्यावरील या अत्याचाराची माहिती चिठ्ठी लिहून वडिलांना कळविली. त्यानंतर तिचे वडीलच तिची आई बाहेर असताना तिच्यावर अत्याचार करू लागले. 5 नोव्हेंबर 2022 रोजी त्याने तिच्या आईला काही कारणास्तव बाहेर पाठवून तिच्यावर अत्याचार केला.
एवढी वर्षे अत्याचार सहन करत आलेल्या या मुलीने कॉलेजमधील एका कार्यक्रमात समुपदेशकापुढे आप-बिती सांगितली. त्यानंतर विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून वडिलांना अटक करण्यात आली आहे. विश्रांतवाडी पोलिस अधिक तपास करत आहेत.