पिंपरी : ‘ऑनलाईन’मुळे रोजगारसंधीचे आकाश मोकळे

पिंपरी : ‘ऑनलाईन’मुळे रोजगारसंधीचे आकाश मोकळे
Published on
Updated on

भास्कर सोनवणे : 

पिंपरी : सगळीकडे ऑनलाईन खरेदीची क्रेझ वाढल्याने या व्यवसायाचे अविभाज्य भाग असलेल्या डिलिव्हरी बॉईजना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध झाला आहे. आतापर्यंत नामांकित ऑनलाईन कंपन्यांद्वारे शहरातील सुमारे 10 हजार युवकांना रोजगार मिळाला आहे. या रोजगार संधीतून संबंधितांना महिन्याकाठी सुमारे 25 ते 60 हजारांपर्यंतचे वेतन मिळते. कोरोना संकटामुळे शहरातील अनेकांच्या हातचा रोजगार गेला; मात्र या संकटातही संधी दडली होती. या संधीतून समाजात एक मोठा बदल घडला, तो म्हणजे ऑनलाईन खरेदी. कोरोनाकाळात गर्दी करण्यास मनाई असल्याने तसेच घरबसल्या खरेदी करता येत असल्यामुळे ग्राहकांनी ऑनलाईन खरेदीस पसंती दिली; परंतु हे सर्व शक्य होते ते डिलिव्हरी बॉईज यांच्यामुळे.

कंपन्यांची ही गरज लक्षात घेऊन अनेक तरुणांनी हाताला काम मिळविले. ऑनलाईनद्वारे रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्या आहेत. पिंपरी चिंचवडची लोकसंख्या साधारण 29 लाखांच्या घरात आहे. आतापर्यंत काही नामांकित कंपन्यांनी लाखों लोकांना ऑनलाईनद्वारे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यापैकी पिंपरी चिंचवड शहरामध्ये ऑनलाईन कंपनींतून आतापर्यंत दहा हजार युवकांना रोजगार मिळाला आहे.

खाद्यपदार्थांपासून ते चैनीच्या वस्तूंपर्यंत

ऑनलाईनद्वारे ग्राहक खाद्यपदार्थ तसेच विविध गरजेचे वस्तू घरबसल्या मागवून घेऊ शकतात. तर काहीजण चैनीच्या वस्तूही मागवून घेतात. त्यामुळे अनेक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होत आहे.

तीन शिफ्टमध्ये काम
कोरोना काळापासून ऑनलाईन खरेदीस मोठी पसंती मिळाल्याने कंपन्यांची माल वेळेवर पोहोच करण्याची जबाबदारीदेखील वाढली. त्यामुळे अनेक कंपन्यांचे काम तीन शिफ्टमध्ये सुरू असते.

वयाची अट नाही
हाताला काम मिळविण्यासाठी कंपन्यांत गेल्यावर वयाचे बंधन असते; मात्र ऑनलाईनच्या व्यवसायात डिलिव्हरी बॉईजना वयाची अट नसल्याने कोणत्याही वयाचा व्यक्ती यामध्ये काम करू शकते.

वेळेचे बंधन नाही
इतर व्यवसायात किंवा नोकरीत वेळेचे बंधन असते. कामगारांना तसेच कर्मचार्‍यांना वेळेचे बंधन पाळावे लागते; मात्र ऑनलाईनच्या व्यवसायात डिलिव्हरी बॉईजना आपल्या सोयीनुसार काम करता येते. वेळेचे बंधन नसल्याने संबंधितांना इतरही कामे करता येतात.

दिवसाला सुमारे दीड हजार कमाई

ऑनलाईन अ‍ॅपद्वारे कस्टमरने ऑर्डर दिल्यानंतर डिलिव्हरी बॉईज ते काही क्षणात घरपोच करतात. डिलिव्हरी बॉईजना दर आठवड्याला पगार दिला जातो. यामधून गरीब, होतकरू, तरुण विद्यार्थ्यांना, पार्ट टाइम, फुल टाइम काम करून कमाई करता येते. काही तरुण दिवसाकाठी सुमारे दीड हजाराची कमाई करतात. शहरात एका कंपनीचे 3 ते 4 सेंटर आहेत. अशा एकूण 12 नामांकित कंपन्या आहेत. त्यापैकी एका सेंटरमध्ये साधारण 300 ते 450 डिलिव्हरी बॉइज तीन शिफ्टमध्ये काम करतात. सर्व कंपनींचे मिळून 30 ते 35 सेंटर असून, एकूण अंदाजे 10 हजार डिलिव्हरी बॉइजना रोजगार मिळत आहे.

ऑनलाईनद्वारे काम करणार्‍या डिलिव्हरी बॉइज तरुणांचे कंपनीकडून इन्शुरन्स काढले जावे, त्यांना पूर्ण सुरक्षितता दिली जावी.
                                                          – यशवंत भोसले, कामगार नेते

ऑनलाईन काम करणार्‍या डिलिव्हरी बॉइज तरुणांचे कंपनीकडून मुलाखत घेतली जाते. यामध्ये शिक्षण किंवा वयाची अट नाही. संबंधितांकडे स्वतःची गाडी व परवाना असणे आवश्यक आहे.
                                               -बिलाल शेख, एका नामांकित कंपनीचे टीम लीडर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news