पिंपरी : कमी वजनाच्या 283 बाळांवर वायसीएममध्ये यशस्वी उपचार | पुढारी

पिंपरी : कमी वजनाच्या 283 बाळांवर वायसीएममध्ये यशस्वी उपचार

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी – संत तुकारामनगर येथील महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय पदव्युत्तर संस्थेत गेल्या सहा महिन्यांत अडीच किलोपेक्षा कमी वजन असलेल्या 283 बाळांवर यशस्वी उपचार करून त्यांना बरे करण्यात यश आले आहे. त्यामध्ये कमीत कमी 640 ग्रॅम वजनाचे आणि 28 आठवड्यांचे बाळ वायसीएम रुग्णालयातून बरे झालेले आहे. बुधवारी वर्ल्ड प्रिमॅच्युअरिटी डे आहे. 37 आठवड्यांपूर्वी प्रसूति झालेली मुले ही अपुर्‍या दिवसांची म्हणजेच प्रिमॅच्युअर असतात. या बाळांचे वजन हे साधारणपणे अडीच किलोंपेक्षा कमी असते. त्यांचे सर्व अवयव पूर्णपणे परिपक्व झालेले नसतात. या बाळांचे खूप वेगळ्या वातावरणात पालनपोषण करावे लागते. त्यांना नवजात शिशु अतिदक्षता विभागात दाखल करून 15 दिवस ते दोन महिन्यांपर्यंतही पालनपोषण करावे लागते.

अडीच किलोपेक्षा कमी वयाचे 365 बाळ

वायसीएममध्ये मे ते ऑक्टोबर अशा सहा महिन्यांत 436 बालकांचा जन्म झाला. त्यापैकी 365 बाळ हे अडीच किलोंपेक्षा कमी वजनाचे होते. त्यातील 283 बाळांना बरे करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यातही 640 ग्रॅम इतक्या वजनाचे आणि 28 आठवड्यांच्या बाळाला वाचविण्यात यश आलेले आहे. त्याचप्रमाणे, रुग्णालयात एका मातेला झालेल्या तिळ्या मुलांचाही जीव वाचविण्यात यश आल्याचे वायसीएम रुग्णालयाच्या बालरोग विभागप्रमुख डॉ. दीपाली अंबिके यांनी सांगितले.

प्रिमॅच्युअर बाळांमध्ये जाणवणार्‍या समस्या

37 आठवड्यांपूर्वी प्रसूती झालेल्या प्रिम्यच्युअर बाळांचे कोणतेही अवयव परिपक्व झालेले नसतात. त्यांच्यात संसर्ग दर जास्त असतो. त्यांची रोगप्रतिकारशक्ती खूप कमी असते. त्याचप्रमाणे, मेंदू, फुफ्फुस पूर्णतः विकसित झालेले नसते. पचनसंस्था खूप नाजूक असते. श्वसनक्रियेचा त्रास होऊ शकतो. ऑक्सिजन कमी-जास्त होऊ शकते. काही बाळांना हदयाचे रोगदेखील असतात. त्यांच्या हृदयाचे ठोके वर-खाली होतात. काही-काही बाळांना जन्मानंतर लगेच ऑक्सिजन व व्हेंटिलेटरचीदेखील गरज लागू शकते. कारण त्यांची फुफ्फुस कमकुवत असतात.

वायसीएममध्ये आज वर्ल्ड प्रिमॅच्युअर डेचा कार्यक्रम

वायसीएम रुग्णालय बालरोग विभागाच्या वतीने गुरुवारी (दि. 17) वर्ल्ड प्रिम्यच्युअर डे निमित्त रुग्णालयातील चाणक्य हॉलमध्ये दुपारी 2ः30 वाजता कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात 20 पालकांना त्यांच्या प्रिमॅच्युअर, उपचारानंतर बरे झालेल्या बाळांसह निमंत्रित केले आहे. या कार्यक्रमात त्यांचा सत्कार करण्यात
येणार आहे.

Back to top button