टाकळी भीमा पाणीपुरवठा योजना 3 वर्षांपासून बंद | पुढारी

टाकळी भीमा पाणीपुरवठा योजना 3 वर्षांपासून बंद

तळेगाव ढमढेरे; पुढारी वृत्तसेवा : शिरूर तालुक्यातील टाकळी भीमा या जेमतेम 3 हजार लोकसंख्या असलेल्या गावाला तीव पाणी प्रश्न भेडसावत आहे. गेल्या तीन वर्षांपासून गावची पाणीपुरवठा योजना बंद करण्यात आली आहे. याबाबत पाणीपुरवठा समितीची चौकशी होऊन संबंधित ठेकेदारावर कारवाईची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

टाकळी भीमा (ता. शिरूर) येथे राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत एक कोटी पाच लाख रुपये या योजनेवर खर्च करण्यात आला होता. लोखंडी वाहिनी वापरण्याऐवजी पीव्हीसी वाहिनी केल्याने वारंवार वाहिनी फुटण्याच्या घटना घडल्या आहेत. गावातील गायकवाडवस्ती, दोरगेवस्ती, घोलपवाडी, निमगाव फाटा या ठिकाणी जलवाहिनीचे पाणी पोहचलेच नाही. संबंधित ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे काम केल्याने सतत काही ना काही बिघाड होऊन पाणीपुरवठा बंद पडत होता. येथील ग्रामस्थांना पाणीपुरवठा सुरळीत मिळेना म्हणून पाणीपट्टी भरण्यासाठी नागरिक तयार नाहीत. देखभाल खर्च ग्रामपंचायतीला परवडेना म्हणून पाणीपुरवठा योजना बंद पडली.

गावातील महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविण्यासाठी राष्ट्रीय पेयजल योजना राबविण्यात आली होती. पाणीपुरवठा समितीने सतत महिलांचा हिरमोड करीत त्यांच्या स्वप्नाचा चुराडा केला आहे. येथील काही ग्रामस्थांनी पाण्याची सोय स्वतःच्या विहिरीवरून, तर बोअरवेलच्या माध्यमातून केली आहे. ज्यांची गैरसोय होतेय, त्यांची आजही पाण्यासाठी हेळसांड होताना दिसत आहे. दरम्यान, या पाणीपुरवठा योजनेची तक्रार माजी सैनिक विठ्ठल वडघुले यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पंचायत समिती यांच्याकडे केली आहे. या तक्रारीची दखल घेत पाणीपुरवठा समितीवर चौकशीचे आदेश देण्यात आले. मात्र, पाणीपुरवठा समितीने प्रतिसाद दिला नसल्याचे तक्रारदारांनी सांगितले.

नवीन जलजीवन पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव पाठविला आहे. ही योजना 3 कोटी 68 लाखांची आहे. यासाठी 10 टक्के लोकवर्गणीतून भरणा करायचा आहे. त्यानंतर योजना चालू होईल. याकामी नागरिकांनी सहकार्य करावे.

                                          – रवींद्र शिंदे, ग्रामसेवक,

Back to top button